भारतीय शेअर मार्केटचा बादशाह काळाच्या पडद्याआड, राकेश झुनझुनवाला यांचे निधन, गुंतवणूकदारांमध्ये पसरली शोककळा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । एकिकडे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी येऊन धडकत नाही, तोच आणखीन एक दु:खद बातमी समोर आली आहे.शेअर मार्केटमधील बादशाह दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Investor Rakesh Jhunjhunwala passes away, king of Indian stock market lost, mourning spread among investors)

Investor Rakesh Jhunjhunwala passes away, king of Indian stock market lost, mourning spread among investors

राकेश झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांनी ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावण्याने फायदा होतो याचं भाकित राकेश झुनझुनवाला करायचे. त्यांनी दिलेला सल्ला योग्य असायचा त्यामुळे अनेकजण त्यांच्या बोलण्याकडे कान लावून असायचे. नवख्या गुंतवणूकदारांना त्यांचा मोठा आधार वाटायचा.

झुनझुनवाला यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. गुंतवणूकदारांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्वीटरवर दिग्गजांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांनी श्रद्घांजली अर्पण केली आहे. झुनझुनवाला यांनी नुकतीच अकासा एअर लाईन्स सुरु केली होती.

राकेश झुनझुनवाला यांनी ऐंशीच्या दशकात वडिलांच्या मार्गदर्शनात शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात केली होती. त्यावेळी अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली होती. या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीच्या आधारे त्यांनी आपले अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले होते.

त्यामुळे मध्यमवर्गीय गुंतवणूकदार वर्गामध्ये राकेश झुनझुनवाला हे लोकप्रिय होते. राकेश झुनझुनवाला हे कोणत्या कंपनीचे शेअर घेतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असायचे. जुलै 2022 अखेरीस त्यांची संपत्ती 5.5 अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 32 व्या स्थानी होते.

काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या ‘अकासा एअर’ या विमान कंपनीचे उद्घाटन केले होते. राकेश झुनझुनवाला हे मागील काही वर्षांपासून आजारी होते. प्रकृती खालावल्याने झुनझुनवाला यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये शोककळा पसरली आहे.

राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक होते. झुनझुनवाला हे ॲपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते.

राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांची टायटन कंपनीमध्ये 5.5 टक्के भागीदारी होती. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये 26 जुलै 2022 मध्ये टायटनचे एकूण मूल्य अंदाजे 10 हजार 300 कोटींच्या आसपास होते. ‘स्टार हेल्थ’मध्ये त्यांची 14.39 टक्के भागिदारी होती.