Sidhu MooseWala । प्रसिध्द गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या घालून हत्या, पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ !

पंजाब : पंजाबमधील सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेसचे युवा नेते सिधू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याघटनेमुळे पंजाबमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Famous singer Sidhu MooseWala shot dead, big stir in Punjab political circles )

पंजाब मधील आम आदमी पार्टीच्या सरकारने कालच राज्यातील 424 जणांची सुरक्षा काढून घेतली होती, त्यात मूसेवाला यांचा समावेश होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबारामध्ये आणखीन दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

सिद्धू मूसेवाला यांनी नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मानसा जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीला सामोरे गेले होते या निवडणुकीत त्यांचा आम आदमी पक्षाचे उमेदवार डॉ विजय सिंघला यांनी पराभव केला होता.

पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार सिद्धू मूस वाला यांच्या हत्येने काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि मित्रांप्रती आमची मनापासून संवेदना,” अश्या शब्दांत काँग्रेसनेच श्रद्धांजली वाहिली आहे.