बाबो… 3 हजार कोटीचे वीजबिल आणि ग्राहक थेट रुग्णालयात

मध्य प्रदेश : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असून, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाचे वाढते दर, वीजबिल यामुळे जनता त्रस्त झाली आहे असे असतानाच मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला कोट्यावधी रुपयांचे वीजबिल आल्याने खळबळ उडाली आहे. ही खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे घडली असून संबंधित व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ग्लाल्हेरमधील संजीव कनकने यांना तब्बल ३ हजार कोटी वीजबिल आले असल्याचा मेसेज आला आणि त्यांना धक्काच बसला. संजीव कनकने हे पेशाने एक वकील आहेत. संजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आलेल्या मेसेजमध्ये वीजबिलाची रक्कम ३,४१९ कोटींहून अधिक रूपयांच्या घरात होती. मेसेज पाहताच संजीव कनकने आणि त्यांची पत्नी प्रियंका दोघांचंही बीपी वाढला.

प्रियंका यांचे वडील राजेंद्र प्रसाद यांना हृदयाचा आजार आहे, त्यांना ही बाब कळवल्यावर त्यांचंही बीपी वाढलं आणि घाईघाईत रूग्णालयात दाखल करावे लागले. एवढ्या रकमेचा वीजबिल आल्यामुळे संजीव यांनी अनेकवेळा वीज कार्यालयाशी संपर्क साधला.

दरम्यान, वीज कार्यालयाने वीजबिलामध्ये आलेल्या काही तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा केली आहे. खरं तर वीजबिल १,३०० रूपये एवढा आहे. वीज कार्यालयाचे व्यवस्थापक यांनी सांगितले की, कर्मचाऱ्याकडून झालेल्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.