जामखेड नगरपरिषदेतील लाचखोरीचा पर्दाफाश, दोघे कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड नगरपरिषदेतील भ्रष्ट कारभाराचा बुधवारी मोठा पर्दाफाश झाला. लाच घेतल्याप्रकरणी लिपीक आणि मदतनीस या दोघांना एसीबीने रंगेहात पकडण्याची मोठी कारवाई केली. यामुळे शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Bribery exposed in Jamkhed Municipal Council, two bribe takers caught by ACB

दोन मुलांचे जन्मदाखले देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना नगरपरिषदेच्या लिपिकासह एका कंत्राटी मदतनीसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जामखेड नगरपरिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

​नेमके प्रकरण काय?

एका तक्रारदाराने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या मुलगा आणि मुलीचा जन्मदाखला मिळवण्यासाठी जामखेड नगरपरिषदेत अर्ज केला होता. हे दाखले मिळवण्यासाठी तक्रारदार नगरपरिषदेच्या फेऱ्या मारत होते. यादरम्यान त्यांनी जन्म-मृत्यू नोंदणी विभागाचे लिपिक अभिजीत जालिम भैसडे (वय ३९) यांची भेट घेतली. मात्र, भैसडे यांनी कामासाठी मदतनीस अहमद इलियास शेख (वय ४३, कंत्राटी कर्मचारी) याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

मदतनीस अहमद शेख याने प्रत्येक दाखल्यासाठी १५०० रुपये याप्रमाणे दोन दाखल्यांचे ३ हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ५ मे २०२६ रोजी अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची ६ मे रोजी पडताळणी करण्यात आली असता, लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने नगरपरिषदेसमोर सापळा रचला.

बुधवारी (६ मे) दुपारी अहमद शेख याने तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची रोकड स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला झडप घालून पकडले. या चौकशीत लिपिक अभिजीत भैसडे यानेही लाच घेण्यास संमती दिल्याचे समोर आले. याप्रकरणी भैसडे आणि शेख या दोघांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटेयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ आणि चालक दशरथ लाड यांच्या पथकाने केली.

जामखेड नगरपरिषदेत सामान्य नागरिकांच्या कामासाठी पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. आजच्या कारवाईमुळे या भ्रष्ट साखळीवर शिक्कामोर्तब झाले असून, सामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. “अशा लाचखोर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी आता जोर धरू लागली