धक्कादायक : ऑनलाईन मागवलेला केक खाणे पडले महागात ; 10 वर्षीय चिमुकल्या मुलीचा मृत्यू !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एका 10 वर्षीय चिमुकल्या मुलीचा वाढदिवस असतो. त्यासाठी ऑनलाईनने केक मागवला जातो. केक येतो. मग मोठ्या आनंदाने केक कापला जातो. सर्वजण मिळून केक खातात. पण दुर्दैवाने वाढदिवस असलेल्या एका चिमुकल्या मुलीला केक खाल्ल्यानंतर आपला जीव गमवावा लागला आहे. ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने देशभर खळबळ उडाली आहे.

10-year-old girl died after eating a cake ordered online, incident in Patiala in Punjab created stir in the country, Manvi birthday video,

ऑनलाईन वस्तु घरपोच मिळत असल्याने अन्नपदार्थ मागवण्याचा ट्रेंड वाढला आहे. विशेषता: पिझ्झा, बर्गर, केक हे सर्वाधिक ऑनलाईन मागवले जातात. लहान मुलांमध्ये केकचे आकर्षण सर्वाधिक असते.वाढदिवसानिमित्त ऑनलाईन मागवलेला केक खाणे एका कुटूंबाला चांगलेच महागात पडले आहे. केक खालल्यामुळे एका मुलीला आपले प्राण गमवावे लागले आहे.सगळ्यांनाच हादरवून टाकणारी ही घटना पंजाबमधून समोर आली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घेऊयात.

पटियाला येथे राहणाऱ्या एका कुटुंबाचा दावा आहे, की त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीचा वाढदिवसाचा केक खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. हा केक ऑनलाइन ऑर्डर केला होता. तिच्या मृत्यूच्या काही तास आधी घेतलेला एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिचा वाढदिवस साजरा करताना खूप आनंदी दिसत आहे.

व्हिडिओमध्ये मुलगी अगदी व्यवस्थित दिसत आहे. तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की केक खाल्ल्यानंतर तिची प्रकृती बिघडली, काही तासांनंतर तिचं शरीर थंड झालं. त्यांनी तिला रुग्णालयात नेलं तेव्हा त्यांना समजलं की मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात केक कुठून आला याचा तपास करणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसंच, मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तिचं नाव मानवी असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे एफआयआर नोंदवला आहे. पोलीस अधिकारी सुरिंदर सिंग सांगतात की, हा केक कुठून आला याचा तपास सुरू आहे. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.एका व्हिडिओमध्ये मुलीचे आजोबा म्हणतात, ‘केक ऑनलाइन ऑर्डर केला. 6 वाजता ऑर्डर केली, 6:15 ला केक पोहोचला आणि 7:15 ला तिने केक कापला.

तो खाल्ल्यानंतर घरातील सर्वांची प्रकृती खालावली. सगळ्यांना चक्कर येत होती. जिचा वाढदिवस होता ती 10 वर्षांची होती, तिचं नाव मानवी होतं. तिची लहान बहीण 8 वर्षांची आहे. दोघींनाही उलट्या झाल्या. धाकटीला खूप उलट्या झाल्या आणि तिने खाल्लेला केक बाहेर पडला. पण तरीही तिला त्रास होत होता.

ते पुढे म्हणाले, ‘मृत्यू झालेल्या थोरल्या मानवीचा केक बाहेर पडला नाही. तिच्या तोंडातून दोनदा फेस आला. आम्हाला वाटलं किरकोळ उलट्या झाल्या. यानंतर ती ठीक होईल. मग ती झोपली. काहीवेळाने तिने उठून पाणी मागितले. घशाला कोरड पडत असल्याचं तिने सांगितलं. मग ती झोपली. पहाटे ४ च्या सुमारास ती थंड पडल्याचं आम्हाला दिसलं. आम्ही तिला दवाखान्यात नेलं. दुसरीकडे, डॉक्टरांनी ऑक्सिजन दिला. यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.’

मृत्यूच्या काही तास आधी घेतलेला व्हिडिओ 👇

दरम्यान, ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने 10 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने देशभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासात नेमकं काय येतयं? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवताना ग्राहकांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. ऑनलाईन घरपोच होणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.