महाराष्ट्र मास्क मुक्त होणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राज्याला मास्क मुक्त करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र (maharashtra) लवकरच मास्क (mask)  मुक्त होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी या सर्व चर्चा धादांत खोट्या असल्याचं सांगितलं.

मंत्रिमंडळात मास्क (mask) बाबत साधी चर्चाही झाली नाही. निर्णयही झाला नाही. या सर्व खोट्या बातम्या आहेत. त्यात काही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्वच मास्क कायम ठेवण्याच्या मताचे आहोत. बाहेरच्या देशात मास्कची सक्ती उठवल्यानंतर त्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे मास्क हे राहिलंच पाहिजे असं आमचं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार आज पुण्यात होते. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मास्क मुक्तीची जी चर्चा रंगली होती त्या चर्चेला अजित पवारांनी स्पष्टीकरण देत ब्रेक लावला आहे. राज्यात अजूनही कोरोना रूग्ण वाढत आहेत. कोरोनापासून बचावासाठी मास्क हाच महत्वाचा पर्याय आहे. मास्क वापरणे अनिवार्य आहे. नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा असेही अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.