वाईनवरून महाराष्ट्रात भाजप विरूध्द सरकार संघर्ष पेटला,पण भाजपशासित मध्यप्रदेशमध्ये वाईनचे धोरण काय ? जाणून घ्या

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राज्याच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील दुकाने आणि सुपर मार्केट माॅलमध्ये वाईन विक्रीस (wine sale)परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विशेषता : भाजपकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला जात आहे. भाजपच्या टीकेला सत्ताधारी गटाकडून पलटवार करत मध्य प्रदेशचे दाखले दिले जाऊ लागले आहेत.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही असा थेट इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.या टीकेला उत्तर देताना मध्य प्रदेशात भाजप सरकारने राबवलेले मद्य धोरणाचे दाखले दिले जात आहेत.

भाजपने मध्य प्रदेशला मद्यराष्ट्र केलंय, त्याचं काय, असा सवाल केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनीही मध्य प्रदेशातील धोरणावरून भाजपला धारेवर धरलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वाईन आणि दारू यात फरक आहे. द्राक्ष आणि काजूतून वाईन तयार केली जाते. अनेक फळातून वाईन तयार केली जाते. वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जेवढी तयार होते तेवढी आपल्याकडे खपत नाही. बाहेरच्या राज्यात किंवा परदेशात निर्यात केली जाते. काही देशात पाण्याऐवजी वाईनच पितात. पण काहींनी मद्यराष्ट्र म्हटलं आहे. मध्यप्रदेशात तर घरपोच वाईन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षाची मागणी आहे. वाईन विकण्यासाठी काही नियम अटी घालून परवानगी दिली आहे. पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याची नियमावली तयार होईल. पण काही लोकांनी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मध्य प्रदेशातले मद्यविषयीचे धोरण काय?

महाराष्ट्रातील वाईन विक्रीच्या धोरणावर टीका करणाऱ्या भाजपचा हा दुटप्पी चेहरा असल्याची टीका शिवसेनेकडून केली जात आहे. तसेच मध्य प्रदेशात भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने तर घराघरात बार उघडण्यास परवानगी दिली आहे. घरातच चार पट अधिक दारू साठा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे भाजपने मध्य प्रदेशला मद्य प्रदेश बनवल्याची टीका केली जात आहे.

मध्य प्रदेश सरकारचे वाईनचे नवे धोरण पुढील प्रमाणे-

  1. मध्य प्रदेशातील चार महानगरांतील विमानतळ आणि मॉल्समध्ये दारुच्या किरकोळ विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.
  2. घरांमध्ये मद्यसाठा चारपट अधिक ठेवता येणार आहे. सध्या मध्य प्रदेशात बिअरचा एक बॉक्स आणि दारुच्या सहा बाटल्या ठेवण्यास परवानगी आहे. नवीन धोरणानुसार, बिअरचे चार बॉक्स आणि दारुच्या 24 बाटल्या घरात ठेवता येतील.
  3. मध्य प्रदेशच्या नव्या उत्पादन शुल्क धोरणानुसार, द्राक्षाव्यतिरिक्त बेरीपासूनही वाईन बनवण्यास परवानदी दिली आहे.
  4. ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये आहे ते घरीच बार उघडू शकतील.