धक्कादायक : खर्ड्यातील युवा उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू ! Unfortunate Death Of Young Entrepreneur Ramesh Walaskar From Kharda

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 5 जानेवारी। जामखेड तालुक्यातील खर्डा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खर्ड्यातील एका युवा उद्योजकाच्या (Young Entrepreneur) दुर्दैवी मृत्यूची घटना आज सायंकाळी समोर आली. या घटनेमुळे खर्डा परिसरावर शोककळा पसरली आहे.

जामखेड तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. तालुक्यातील अनेक तरूण उद्योग व्यवसायाकडे वळू लागले आहे. नवनव्या उद्योगात काही धडपडे तरूण उतरत आहेत. आपल्या पायावर उभे राहत आहेत. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रमेश उर्फ नाना सदाशिव वाळस्कर (वय 22) (Ramesh Walaskar) या युवा उद्योजकाने स्वता:च्या पायावर उभे राहण्यासाठी दाळमिल व्यवसाय सुरू केला होता.

रमेश वाळस्कर हा स्वता: डाळमिल थांबून काम करायचा. खर्डा – जामखेड रस्त्यावरील गोलेकर लवण भागात त्याने डाळमिल टाकली होती. नवा असल्याने या व्यवसायातील बारिक सारीक गोष्टी शिकणे, मिल चालवणे या गोष्टी तो स्वता: करायचा. परंतू  बुधवारचा दिवस रमेशसाठी अखेरचा ठरला. एका दुर्दैवी अपघाती घटनेत काळाने रमेशवर झडप घातली.

काय आहे घटना ?

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रमेश उर्फ नाना सदाशिव वाळस्कर (वय 22) हा नेहमी प्रमाणे  स्वता:च्या डाळमिलवर काम करत होता. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास दाळ मिलवर काम करत असतानाच रमेश याच्या गळ्यातील मफलर दाळमिलमध्ये अडकल्याने गळफास लागला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने खर्डा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या रमेशने स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी दाळमिल टाकून नुकताच व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाच्या माध्यमांतून उद्योजक होण्याचे स्वप्न पाहून तो झपाटून काम करत होता. परंतू बुधवारी रमेशवर काळाने झडप घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रमेशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे खर्डा परिसर शोकसागरात बुडाला आहे.

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

मयत रमेश याचे वडिल सैन्यात होते. ते निवृत्त झाले होते. त्यांचाही काही वर्षापुर्वी मृत्यू झाला आहे. रमेश याच्या कुटूंबात आई, वडील, बहिणी भाऊ, भावजय असा परिवार आहे. कुटूंबात रमेश हा धाकटा होता. रमेश याच्या आकस्मिक मृत्यूमुळे वाळस्कर कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तरुण युवा उद्योजकाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.