Mahavidyalaya news : राज्यातील महाविद्यालये व वसतीगृहे बंद करण्याची घोषणा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 5 जानेवारी | Mahavidyalaya news | राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. बुधवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant latest news about college) यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली.

राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सामंत फेसबुक live द्वारे संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली.

मंगळवारी यासंदर्भात सविस्तर बैठक झाल्यानंतर मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. “सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं”, असं सामंत म्हणाले.

राज्यातील सर्व वसतीगृहे बंद करण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था असणार आहे.