ओढ्याला आलेल्या पुरात कार बुडून दोघांचा मृत्यू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यभरात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे राज्यातील सर्व लहान मोठे प्रकल्प तुडूंब भरले आहे. सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अचानक होत असलेल्या अतिवेगवान पावसामुळे नद्यांसह ओढ्यांना पुर येण्याच्या घटना वाढल्या आहे. पुराचा अंदाज न आल्याने वडिलांसह मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Two people died after their car drowned in the stream, an accident in Phaltan taluka

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कार वाहून जाण्याची घटना घडली. यात वडिलांसह मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्ह्यात परतीचा पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. जिल्ह्यातील नद्या – ओढे तुडूंब वाहत आहेत. अचानक होणाऱ्या धुव्वाधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण होत आहे. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. फलटण तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे.

फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील एका ओढ्याला पुर आला होता. याच पुरात एकाने धाडस करत कार घातली. परंतू पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कार पाण्यात बुडून वाहून गेली. या घटनेत छगन मदने आणि प्रांजल मदने (वय 13) या दोघांचा मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या मदतीने सदर कार पाण्यातून बाहेर काढली. मात्र या घटनेत वडिलांसह मुलीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. मयत दोघे माण तालुक्यातील वारूगड येथील रहिवासी होते.