जामखेडच्या दोघा मोटारसायकल चोरांना बार्शीत अटक

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : परगावाहून बार्शी शहरात आलेले दोन इसम दुचाकी चोरून घेऊन जात असल्याची माहिती बार्शी शहर पोलिस गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी दोघांना पकडले आहे. त्यांच्या दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. अटकेतील दोघे आरोपी जामखेड येथील रहिवासी आहेत.

Two motorcycle thieves from Jamkhed arrested in Barshi

प्रथमेश सुरेश उर्फ प्रताप पवार व सचिन रोहिदास डोकडे (दोघे रा. तपणेश्वर गल्ली, जामखेड, जिल्हा नगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना मंगळवार, दि. ४ जुलै २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास ताडसौंदणे ते बार्शी रस्त्यावर झाली.

मंगळवारी रात्री दोन इसम चोरीच्या मोटरसायकल घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचला. रात्री अकराच्या सुमारास दोन संशयित दोन दुचाकीवरून बार्शीच्या दिशेने येताना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा देऊनही ते जाऊ लागल्याने पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.

ताब्यात घेऊन त्यांच्याकडे शहर विचारपूस करताना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन बार्शी शहर पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही मोटरसायकल पुण्यातून चोरीस गेल्याच्या तक्रारी हडपसर व डेक्कन पोलिस ठाणे पुणे येथे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस फौजदार अजित वरपे, शैलेश चौगुले, अमोल माने, मनीष पवार, वैभव ठेंगल, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, रविकांत लगदिवे, सचिन देशमुख, अविनाश पवार, अंकुश जाधव यांनी केली.