एकल कलाकारांनी अर्थसहाय्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर करावे – जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एकल कलाकारांना शासनाच्या वतीने एकरकमी पाच हजार रूपयांचे अर्थसहाय्य योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.अर्थसहाय्यासाठी तहसीलदार यांच्याकडे 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत,असे अवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी केले आहे.

Soloists should submit applications to Tehsildars for financial assistance , District Social Welfare Officer radhakisan devadhe,

ज्या कलाकारांच्या उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे आहे. या कलाकारांची कोरोना काळात आर्थिक कुचंबणा झाली आहे.अशा एकल कलाकारांनी या एकरकमी मानधनासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर करावा.

तहसीलदार यांना सादर करावयाच्या अर्जासोबत महाराष्ट्रात १५ वर्ष वास्तव्याचा दाखला, तहसीलदार उत्पन्न दाखला, कलाक्षेत्रात १५ वर्ष कार्यरत असल्याबाबत पुरावा, आधारकार्ड, बॅंक खाते तपशील, शिधापत्रिकेची सत्यप्रत आदी कागदपत्रे सादर करावीत, असे अवाहन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

प्राप्त अर्जातील पात्र लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत करण्यात येऊन सदरचा प्रस्ताव संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय,मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.

कलाकारांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प), महानगरपालिका आयुक्त, नगरपालिका/नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा सूचना प्रसारण अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प (सदस्य सचिव) तसेच कलाक्षेत्रातील १० कलाकारांचा समावेश आहे. सदर समिती पात्र लाभार्थ्यांची निवड करणार आहे.