धक्कादायक  : पारनेरच्या एका शाळेत कोरोनाचा विस्फोट, एकाच दिवसात अर्धशतक पार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने देशाची चिंता वाढलेली असतानाच महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पारनेर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.रविवारी टाकळी ढोकेश्वर या गावात कोरोनाचा अक्षरशा: विस्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Shocking: Corona blast at Parner school, half a century passed in one day)

कोरोना महामारीमुळे राज्यातील शाळांची पुरती वाट लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. आता कुठे शाळा सुरू झाल्या होत्या. शाळा सुरू झाल्याचा आनंद ओसरत नाही तोच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. शालेय विद्यार्थी कोरोना बाधित आढळून येण्यास सुरूवात झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शुक्रवारी 19 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यातच आता रविवारी याच विद्यालयातून आणखी एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी या विद्यालयात करण्यात आलेल्या कोरोनाचा चाचण्यांचा अहवाल रविवारी समोर आला असून यात 52 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान टाकली ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 52 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र भोसले यांनी दुपारी विद्यालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्याधिकारी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

दरम्यान शुक्रवारी जवाहर नवोदय विद्यालयात 19 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. तर आज रविवारी 52 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकट्या जवाहर नवोदय विद्यालयातील रूग्णांची संख्या आता 71 इतकी झाली आहे.  या विद्यालयात कोरोनाचा उद्रेक झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान जे रूग्ण आढळून आले आहेत त्या सर्वांवर पारनेरमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान नवोदय विद्यालयातील इतर 410 विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी 27 तर शनिवारी 25 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. विद्यालयातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत.