अहमदनगर : विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांसाठी भरती

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हयातील न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) यांचे न्यायालयातील फौजदारी विभागाचे विशिष्ट खटल्यांचे कामांसाठी २३ विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांसाठी जिल्ह्यातील वकील / विधिज्ञ यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अशी माहिती अहमदनगर सरकारी अभियोक्ता कार्यालयाचे सहाय्यक संचालक आनंद विष्णू नरखेडकर यांनी दिली आहे.

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदासाठीचा अर्जदार हा भारताचा नागरिक असावा,  अर्जदाराचे वय ४३ वर्षापेक्षा अधिक असू नये, मान्यताप्राप्त विधी शाखेची पदवीधारक व वकील म्हणून नोंदणी केलेला, कमीत कमी ५ वर्षे फौजदारी प्रकरणे न्यायालयामध्ये चालवण्याच्या वकिलीचा अनुभव असावा. विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्‍ता यांची नेमणूक ही तात्‍पुरत्‍या स्‍वरूपाची असून कोणतीही पुर्वसुचना न देता केव्‍हाही संपुष्‍टात आणण्‍यात येईल.

नेमणुका फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २५ (३) मधील तरतुदीनुसार विशिष्ट फौजदारी प्रकरणासाठी असली तरी त्यास नेमून दिलेल्या न्यायालयातील बोर्डावरील दैनंदिन फौजदारी प्रकरणे हाताळणे आवश्यक राहील, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे काम असमाधानकारक असल्याचे निष्पन्न झाल्यास किंवा त्यांचे विरुध्द तक्रार प्राप्त झाल्यास त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्ती रद्द करण्यात येईल,  जिल्ह्यातील कोणत्याही न्यायालयात काम करण्याची तयारी असावी, त्यांना अन्य कोणत्याही प्रकरणात खाजगी व्यक्तीतर्फे खटल्यात काम करता येणार नाही.

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून शासनाचा पुर्णवेळ सेवक म्हणून नियुक्ती नसल्याने तात्पुरत्या स्वरुपाचे पॅनलवर कितीही वर्ष काम पाहिले तरी त्यांना नियमित सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदावर हक्क सांगता येणार नाही. तसेच या कालावधीत फायदा अन्य कोणत्याही शासकीय पदांचे नियुक्तीकामी वयोमर्यादेतील सुट म्हणून घेता येणार नाही.

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांना शासकीय पदाचे कोणतेही फायदे अनुज्ञेय असणार नाहीत. अहमदनगर जिल्ह्यातील सध्या कार्यरत असलेल्या विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांना या पॅनलसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. या पदासाठी विहीत नमुन्यातील अर्ज दि. १२ ऑगस्‍ट २०२२ पर्यंत करावा

अर्ज ‘सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्त कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, अहमदनगर या पत्त्यावर तीन प्रतीत अर्ज सादर करावा.मुदतीनंतर आलेल्‍या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी ०२४१-२३२२४६४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.