भू संपादनात प्रांताधिकाऱ्याने पैसे खाल्ले  : खासदार सुजय विखे यांचा खळबळजनक आरोप 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । अहमदनगर-करमाळा महामार्गाच्या भूसंपादनासाठी तत्कालीन प्रांताधिकाऱ्याने प्रत्येक शेतकऱ्यांकडून एक टक्का रक्कम घेतली होती, असा सनसनाटी आरोप खासदार सुजय विखे पाटील यांनी आज जामखेड तालुका दौऱ्यात केल्याने कर्जत – जामखेड मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.

राम शिंदे हे पालकमंत्री असताना अहमदनगर- करमाळा राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्रित मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमांतून 2000 कोटींची मंजुरी मिळवली होती,असे सांगत या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या भू संपादनाची प्रक्रिया सुरू असताना कर्जतच्या तत्कालीन प्रांताधिकार्याने शेतकऱ्यांकडून एक एक टक्का रक्कम घेतली होती असा गंभीर आरोप विखे यांनी आज जामखेड तालुक्यात बोलताना केला. या दौऱ्यात माजी मंत्री राम शिंदे व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना सुजय विखे म्हणाले की , अहमदनगर- करमाळा महामार्गासाठी भू संपादन करत असताना तत्कालीन प्रांताधिकारी यांनी प्रत्येक शेतकऱ्यांकडून एक एक टक्का रक्कम घेतली, ही बाब आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही बैठक घेतली व प्रत्येक शेतकऱ्याला नोटीस काढून आज एकही रूपया खर्च न करता हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जात आहे. हे आमदाराला दिसत नव्हतं का ? असे सांगत आमदार रोहित रोहित पवार यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले.

पुढे बोलताना विखे म्हणाले, जो प्रांत प्रत्येक भू संपादनात पैसे खाता होता, तिची दोन वर्षांची मुदत संपलेली असतानाही एक वर्षे मुदतवाढ कशी मिळाली याचे कारण काय ? असा सवाल उपस्थित करत अहमदनगर- करमाळा महामार्गाच्या भू संपादनात तत्कालीन प्रांताधिकारी कुणाच्या आशिर्वादावर शेतकऱ्यांकडून पैसे खात होता असा गंभीर आरोप विखे यांनी केला.

खासदार सुजय विखे यांनी जामखेड दौर्‍यात अहमदनगर- करमाळा महामार्गाच्या भू संपादनात अधिकाऱ्यांकडून झालेल्या आर्थिक लुटमारीचा पर्दाफाश करत मोठा बार उडवून दिला आहे.आता या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई होणार का ? याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

खासदार सुजय विखे पाटील आज जामखेड तालुका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी वरिल गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाचा रोख तत्कालीन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्याकडे तर नव्हता ना अशी चर्चा आता मतदारसंघात चर्चिली जाऊ लागली आहे.