घरा घरात काठ्या वाटा; वेळ आल्यावर बघू  : सुजय विखेंच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे ? ? 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। सगळ्या पक्षात जाऊन आलो आम्ही पण एक तेव्हढा सोडलाय,तिथं आपलं गणित बसत नाही.एवढं सार पक्षांतर करूनही जनता आमच्या पाठीशी का उभी राहीली. कारण प्रत्येक गोरगरिबापर्यंत हाॅस्पीटलच्या माध्यमांतून सेवा दिली.ते लोकं कधीच आम्हाला विसरत नाहीत. त्याचं मतदान दुसरीकडे जाऊच शकतं नाही. त्यांना पैसे द्या, सल्ला द्या, त्यांना काहीही द्या, हे लोक विसरत नाहीत असे म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी संघर्षांसाठी सज्ज रहावे असे अवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

साठ वर्षांपुढील नागरिकांना समाजात न्याय मिळत नाही म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय वयोश्री ही योजना आणली आहे. या योजनेतून चष्मा, काठी कानाचे मशीन,बेल्ट,कृत्रिम दात यासह वीस प्रकारच्या वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. याच अनुषंगाने जामखेडमध्ये शिबिर आयोजित केले होते. त्या पार्श्वभूमीवर जामखेड दौर्‍यावर खासदार सुजय विखे पाटील आज आले होते.

शिबिराला भेट देण्याआधी त्यांनी तालुक्यातील हळगावला भेट दिली. तिथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना विखे यांनी वरिल वक्तव्य केले.

60 वर्षांवरील नागरिकांचा आधार बनण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.व्यक्तिगत लाभाच्या योजना प्रत्येक गरिबांच्या दारात पोहचवा तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही.आपण सर्व संघर्ष करायला तयार आहोत. पण आपण सुध्दा तेवढ्याच स्फुर्तीने मैदानात उतरले पाहिजे असे अवाहन सुजय विखे यांनी यावेळी बोलताना केले.

विखे पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमांतून प्रचंड काम कर्जत जामखेडमध्ये होत आहे.सर्व सामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्यास यातून कार्यकर्त्यांना ताकद मिळत असते. पन्नास वर्षे आमचं कुटुंब राजकारणात टिकलं आहे ते उगीच नाही. जनतेला योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी काम करा. निवडणुकीत खर्च लागणार नाही.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतून लाभार्थ्यांना ज्या काठ्यांचे वाटप करायचे आहे त्यावर मिश्किल टिप्पणी करताना विखे म्हणाले की, घरोघरी काठ्या पोहच करा.काठी हाच आधार आहे. त्याचा वापर कसा करायचा ते पाहू आपण, असे सांगत आधी काठीची सोय तर करा. काठ्या लाकडाच्या नाहीत तर स्टेनलेस स्टीलच्या आहेत. गरज आली तर त्याचाही वापर आपण करू पण त्या आधी घराघरात त्या द्या असे सांगत खासदार सुजय विखे यांचा रोख नेमका कुणाकडे याचीच चर्चा रंगली होती.

यावेळी कार्यक्रमात माजी मंत्री राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, पंचायत समिती सदस्य डाॅ भगवान मुरूमकर, सोमनाथ पाचरणे, अंकुश शिंदे सह आदी उपस्थित होते.

पहा : खासदार सुजय विखे पाटलांची तुफान फटकेबाजी