जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जीवन ही एक स्पर्धा आहे, यश आणि अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. अपयशाला कुरुवाळत न बसता जिद्दीने उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशीच स्पर्धा करावी व त्यातून यशाचे शिखर गाठावे, कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी, ०५ एप्रिल, २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी परिषदेमार्फत करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाॅ गोरक्ष ससाणे बोलत होते.
दैनंदिन जीवनात खेळाचे खूप महत्व आहे. परंतू खेळासाठी कमी वेळ दिला जातो. विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये सहभागी होऊन तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे व आपल्या उत्कृष्ट कामगिरीतून महाविद्यालयाचे,त्याबरोबरच आपल्या विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत हार मानू नये, नव्या उमेदीने काम करावे आणि सांघिक भावना जपून यश प्राप्त करावे, असे अवाहन डाॅ ससाणे यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनावणे, विध्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे,विद्यार्थी परिषद सभापती अक्षदा जमादार, संयोजक सोनाली शिवशरण, प्रथमेश रघतवान, पूजा चेके, धनश्री खामकर, प्रविण फुंदे आणि इतर प्राध्यापक वृंद डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. नजीर तांबोळी, डॉ. मनोज गुड, प्रा. पोपट पवार, प्रा. अरुण पाळंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थी परिषद सभापती अक्षदा जमादार यांनी विद्यार्थी परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला. वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाच्या १७३ विद्यार्थांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी सर्व सांघिक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत अव्वल स्थान प्राप्त केले.
मुकुंद माधव फाऊंडेशन शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या प्रांजली भोगल, कांचन लांघे, श्वेता पाटील, सृष्टी यादव या प्रथम वर्षातील विद्यार्थिनींना गौरवण्यात आले. या शिष्यवृत्ती अंतर्गत दरवर्षी ५०,००० रुपयांची मदत केली जाणार आहे. फाऊंडेशनमार्फत देण्यात आलेल्या कीटचे वाटप डॉ. ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयात १८ ते २२ मार्च, २०२४ या कालावधीत पार पडलेल्या ‘अंकुरण २०२४’ कला व क्रीडा कार्यक्रमाअंतर्गत चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, निबंध, वादविवाद, बुद्धिबळ, बॅडमिंटन, कबड्डी, क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. सोनावणे यांनी विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना जिद्द बाळगून उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सूचित केले.
महाविद्यालयाचे डॉ. अनारसे यांनी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये हिरीरीने घेतलेल्या सहभागाबद्द्ल कौतुक केले. क्रीडा स्पर्धाच्या आयोजनामध्ये सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण डॉ. राहुल विधाते आणि डॉ. निलेश लांडे, डॉ. महेश निकम, डॉ. अंबादास मेहेत्रे, नवनाथ शिंदे, डॉ. उत्कर्षा गवारे, डॉ. निकिता धाडगे, अर्चना महाजन, डॉ. प्रणाली ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले. तर सूत्रसंचालन वैष्णवी मुंडे, प्रतीक्षा मोरे यांनी तर सोनाली शिवशरण यांनी आभार मानले केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.