जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड बाजार समितीचे माजी सभापती तथा जामखेड तालुक्याच्या राजकारणातील पितामह स्वर्गीय लोकनेते श्रीरंगराव (भाऊ) कोल्हे यांचा आज पहिला स्मृतीदिन ! जाणून घेऊयात भाऊंच्या कार्याचा धावता आढावा.
स्वर्गीय जेष्ठ नेते श्रीरंगराव (भाऊ) कोल्हे यांचा जन्म 18 जुलै 1935 सालचा. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरूवात इंदिरा काँग्रेसमधून केली. काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत नेता म्हणून त्यांची अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय पटावर ओळख होती. अतिशय संयमी राजकारणी म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांच्या शब्दांला राजकारणात मोठे वजन होते.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात स्वर्गीय श्रीरंग भाऊ कोल्हे यांनी सहकारमहर्षी स्वर्गीय गोपाळराव सोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश केला. अहमदनगर जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थेचे ते 1979 ते 1989 अशी दहा वर्षे संचालक होते, त्यापैकी दोन वर्षे त्यांनी चेअरमनपद भूषवले. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. विखे – कोल्हे ही गुरू-शिष्याची जोडी अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असायची.
स्वर्गीय श्रीरंगराव (भाऊ) कोल्हे हे सलग 11 वर्षे जामखेड बाजार समितीचे सभापती होते. तसेच जवळा गावचे ते 25 वर्षे सरपंच तर 5 वर्षे उपसरपंच होते.जवळा सेवा संस्थेच्या 70 वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 40 वर्षाहून अधिक काळ तर ग्रामपंचायतीच्या 60 वर्षाच्या कार्यकाळात 40 वर्षाहून अधिक काळ कोल्हे गटाने एकहाती वर्चस्व कायम ठेवले. कोल्हे यांच्या निधनानंतरही जवळा सोसायटीवर यंदा पुन्हा कोल्हे गटाची सत्ता आली. जवळेकर जनतेने कोल्हे यांचे विचार जिवंत ठेवत वाहिलेली श्रध्दांजली तालुक्याच्या राजकारणात चर्चेची ठरली आहे.
श्रीरंगराव कोल्हे अर्थात भाऊंनी जामखेड तालुक्याच्या राजकारणात बजावलेली भूमिका खूप मोलाची आहे. जामखेड तालुक्याच्या राजकारणात कोल्हे यांची भूमिका नेहमी किंगमेकरची राहिली. कोल्हे गटाकडे जामखेड तालुक्यातील एक तृतीयांश सत्ता नेहमी एकवटलेली असायची. कोल्हे यांच्या राजकीय चमत्काराचा करिष्मा अनेक निवडणुकांमध्ये निर्णायक राहिला. यामुळे अनेकांना कोल्हे यांचा राजकीय आशिर्वाद हवा हवासा होता.
मागील 15 वर्षात कोल्हे यांनी माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे यांना राजकीय आशिर्वाद देण्याची सातत्याने भूमिका घेतली. यातून शिंदे यांना मोठा राजकीय फायदा झाला.जेष्ठ मार्गदर्शक म्हणून शिंदे यांनी कोल्हे यांना नेहमी आदरस्थानी ठेवले. त्यांचा यथोचित सन्मान राखला. कोल्हे यांच्या शब्दाला शिंदे यांच्याकडे मोठी किंमत होती.कोल्हे यांनी टाकलेला शब्द शिंदे यांनी कधीच खाली पडू दिला नाही.
जेष्ठ नेते श्रीरंगराव (भाऊ) कोल्हे यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात जामखेड तालुक्यातील 100 ते 125 जणांचे संसार उभे केले. शेवटच्या श्वासापर्यंत जामखेड तालुक्याच्या राजकारणात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. तरूणांना लाजवेल अश्या ऊर्जेत कोल्हे यांचा राजकीय वावर असायचा. मागील वर्षी त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते 86 वर्षांचे होते. जामखेड तालुक्याच्या राजकारणातील जुन्या पिढीतील यशस्वी राजकीय नेत्यांपैकी कोल्हे हे महत्वाचे नेते होते. कोल्हे यांच्या जाण्याने जामखेड तालुकाच नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे मोठे राजकीय नुकसान झाले.
दरम्यान, स्वर्गीय श्रीरंग भाऊ कोल्हे यांचे चिरंजीव दत्तात्रय कोल्हे व संपूर्ण कोल्हे कुटुंबियांच्या दु:खात माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार रोहित पवार, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनिल कर्जतकर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कर्जतचे जेष्ठ नेते डॉ.आदिनाथ चेडे, डॉ शिषिकांत टेकाडे, माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठलराव वाघमारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, माजी सभापती सूर्यकांत मोरे, माजी सभापती तुषार पवार, माजी नगराध्यक्ष नामदेव राउत, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डॉ. महादेव पवार, जवळा सोसायटीचे चेअरमन शहाजी अप्पा पवार, ज्योती क्रांतीचे चेअरमन आजिनाथ हजारे, दशरथ हजारे, माजी सभापती सुभाष आव्हाड यांनी प्रत्यक्ष भेटून धीर दिला.
तर खासदार सदाशिव लोखंडे, आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे, पैठणचे माजी आमदार भाऊसाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष अभय अगरकर, माजी नगराध्यक्ष एकनाथ आळेकर या मान्यवरांनी फोन करून तसेच जामखेड तालुक्यातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य, राजकीय पक्षांचे व संघटनांचे तालुका अध्यक्ष,तालुक्यातील सरपंच, चेअरमन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोल्हे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत कोल्हे कुटुंबियांना धीर दिला.
कोल्हे कुटुंबावर प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील मान्यवर कोल्हे कुटुंबाच्या दुःखात त्यांच्या पाठाशी खंबीरपणे उभे राहिल्याचे संपूर्ण वर्षभरात दिसून आले. आज स्वर्गीय श्रीरंग भाऊंचा पहिला स्मृतीदिन साजरा होत आहे. संपूर्ण वर्षभरात कोल्हे कुटुंबाच्या दु:खात सहभागी झालेल्या सर्वांच्या प्रति कोल्हे कुटुंबीयांकडून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.