National Voters’ Day | राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने सेल्फी विथ वोटर कार्ड स्पर्धा ! स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणून घ्या नियमावली !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | अहमदनगर जिल्‍हा निवडणूक शाखेच्‍या वतीने 25 जानेवारी रोजी राष्‍ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्‍ताने राज्‍यातील पहिल्या स्वीप कक्षाचे उद्घाटन जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्‍हा निवडाणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली आहे. (Selfie with Voter Card Competition on the occasion of National Voters’ Day)

यावेळी मतदार जनजागृती विषयक ऑनलाइन वेबिनार, सेल्फी विथ मतदार ओळखपत्र या उपक्रमांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. तसेच मतदार जनजागृती विषयी जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे व्याख्यान होणार आहे.

विविध कार्यक्रम सोशल मिडीयाच्‍या माध्‍यमातून प्रसारित केले जाणार आहे. 12 व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे “सुलभ, सर्वसमावेशक आणि सहभागक्षम निवडणुका” हे घोषवाक्य आहे.

सेल्फी विथ मतदार कार्ड या स्पर्धेसाठी स्वत:च्या राष्ट्रीय मतदार ओळखपत्रासह सेल्फी फोटो काढावयाचा असून उत्कृष्ट प्रवेशिकांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपले सेल्फी फोटो 9595545555 या व्हाट्सअप क्रमांकावर अथवा https://wa.link/mz1mcn या लिंकवर सोमवार 24 जाने.2022 सायं 6 वाजेपर्यंत पाठवावेत असे आवाहन मतदारदूत डॉ.अमोल बागूल यांच्या वतीने करण्यात येत आहे

या उपक्रमांसाठी (निवडणूक) तहसीलदार शितोळे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर रोडे यांसह अहमदनगर जिल्हा निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.