Tanaji Sawant : मंत्री तानाजी सावतांनी उडवला 2024 च्या निवडणुकीचा बार, म्हणाले, 2024 ला मतदारसंघ साफ करायचाय, आमदार राम शिंदेंकडे लोकं आशेनं पाहत आहेत, … त्या ठिकाणी छातीवर पहिला वार झेलणारा हा तानाजी सावंत असेल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। 29 ऑक्टोबर 2022 । “भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमातून जोरदार शक्तिप्रदर्शनाची अचूक संधी साधली. या संधीला नव्या उंचीवर नेण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची मोजक्या शब्दांत केलेली फटकेबाजी नवा जोश भरणारी ठरली. मंत्री सावंत यांनी 2024 च्या निवडणुकीची साखरपेरणी करत राजकीय बार उडवून दिला.”
“राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत 28 रोजी जामखेड तालुक्यातील चोंडी दौर्यावर आले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास सावंत हे हेलिकॉप्टरने चोंडीत दाखल झाले. यावेळी शिंदे समर्थकांसह आरोग्य विभागाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ दर्शना बारवकर, डाॅ शशांक वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ संदिप सांगळे, डाॅ सुनिल बोराडे, डाॅ युवराज खराडे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी मंत्री तानाजी सावंत यांचे स्वागत केले.”
त्यानंतर मंत्री तानाजी सावंत हे भाजपा नेते आमदार राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमस्थळी पोहचले. यावेळी आमदार राम शिंदे यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा यथोचित सन्मान केला.त्यानंतर सावंत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटीलसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मंत्री सावंत यांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.
यावेळी बोलताना मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, “येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठ मोठे झाडू घेऊन आपल्याला कर्जत-जामखेड हा मतदारसंघ साफ करायचा आहे, एका ठिकाणी जनशक्ती आहे, तर एका ठिकाणी धनशक्ती आहे, त्यांना वाटतं की धनशक्तीच्या जोरावर, पुर्ण महाराष्ट्र विकत घेऊन,अमेरिकेला जगायला जावू,आपल्याला ते करायचं नाही, आपल्याला सर्वसामान्य जनतेसाठी काम करत रहायचं आहे, ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही आहोत,असे सावंत म्हणाले.”
- आपलं व्रत प्राध्यापकाचं आहे, शिक्षकाचं आहे, लोक जागृतीचं आहे, आणि लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचं आहे, तेच व्रत सरांचं आणि माझं आहे.
- आजपर्यंत बलाढ्य शक्तींशी तानाजी सावंत एकटा लढत होता, आता राम शिंदे आणि नारायण आबांसारखी मंडळी माझ्या बरोबर असल्यामुळं इथून पुढं मी बिनधास्त आहे.
- तुम्ही कुठलही काम सांगा त्या ठिकाणी पहिला वार छातीवर झेलणारा हा तानाजी सावंत असेल असे वचन देत मंत्री तानाजी सावंत यांनी पवार कुटुंबाचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला
“सावंत पुढे म्हणाले, माझे मित्र रामजी शिंदे यांनी आमंत्रण दिलं, त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आलो, तसं तर आमंत्रणाची गरजच नव्हती, त्यांनी आदेशच द्यायचाय, कारण ते माझे मित्र आहेत.ज्या – ज्या ठिकाणी अन्याय करणारी जत्रा पोहचते, त्या – त्या ठिकाणी, अश्या लोकांच्या बरोबर जायचं, हे मी माझं कर्तृत्व समजतो, म्हणून मी त्याठिकाणी आलोय, असे सावंत म्हणाले,”
- “विकासाच्या दृष्टीने साफ सफाई करायची आहे आणि विकास करायचा आहे, परिवर्तन करणे, ऊर्जा तयार करणे हेच आम्हा शिक्षकांचं काम असतं, लोकांना ज्ञानी करणं, सजग करणं, ते काम करायचयं, म्हणजे झाडू घ्यावाच लागेल ना हातात, असे म्हणत सावंत यांनी अगामी 2024 चा राजकीय बार उडवून दिला.”
“चोंडीत आलोय, येथील कार्यकर्त्यांचा उत्साह हा ऊर्जा वाढवणारा आहे. लोकं आशेनं आमचे मित्र प्रा रामजी शिंदे यांच्याकडे बघत आहेत, विकासाची वाट ते बघतायेत,गेली दोन अडीच वर्षात विकासाची बोंबा बोंब होती, महाराष्ट्र पाच ते सात वर्षे मागं गेलेला आहे, म्हणून आमचं आता दायित्व आहे,मागच्या अडीच वर्षाचा बॅकलॉग भरून काढणं, आणि चांगलं काम करणं, 2024 ला भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार आणणं हे आमचं ध्येय आहे असे सावंत यांनी स्पष्ट केले”
एअरबस प्रकरणावर बोलणे टाळले
एअरबस प्रकरणावरून मंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, याबाबत सावंत म्हणाले त्या बद्दल मी माहिती घेतलेली नाही, याबद्दल माझे वरिष्ठ बोलतील असे सांगुन सावंत यांनी बोलणे टाळले, त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा रूग्णालयात झालेल्या जळीत कांडात मंत्री सावंत यांनी बोलणं टाळले.
त्यांनी बोलवलं की मी आलो
आमदार राम शिंदे हे मंत्री असताना मतदारसंघातील आरोग्य केंद्रांसाठी मोठा निधी आणला होता, आता ही कामे पुर्ण झाली आहेत, या कामांची उद्घाटने कधी होणार या प्रश्नावर बोलताना मंत्री सावंत म्हणाले की, आमचे मित्र रामजी शिंदे यांनी ठरवायचं, त्यांनी बोलवलं की मी आलो, असे सांगितले.