जामखेड : माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर यांच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ गुन्ह्यांत वाढले नवीन कलम !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 29 ऑक्टोबर 2022 । जामखेड शहरातील अंदुरे कुटुंबातील सदस्यांना 50 लाखांच्या खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आता आणखीन दोन नवीन कलमे वाढवण्यात आली आहेत.यामुळे जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Jamkhed, Former Panchayat Samiti Chairman Dr Bhagwan Murumkar's problem has increased, new section has been added to those crimes

ऐन दिवाळीत अंधुरे विरूद्ध मुरुमकर हा वाद उफाळून आला होता, मुरुमकर यांच्या साथीदारांकडूून जामखेड शहरातील व्यापाली उमेश अंदुरे, शशिकांत अंदूरे, सागर अंदुरे यांना मारहाण करण्याची घटना घडली होती. या प्रकरणी जामखेड पोलिसांत कलम 387 नुसार माजी सभापतींसह त्यांच्या सात आठ सहकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. या घटनेत उमेश अंदुरे, शशिकांत अंदूरे हे दोघे अंदुरे बंधू जखमी असल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरु होते. त्यांचा मेडिकल अहवाल जामखेड पोलिसांना प्राप्त झाला आहे.

या अहवालानंतर जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या कलम 387 च्या गुन्ह्यात नवीन दोन कलमे वाढवण्यात आली आहेत. यात 307 आणि 326 या दोन कलमांचा समावेश आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी दिली.

जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर यांच्याविरोधात खंडणीसह खुनाचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याने मुरूमकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.