एका फोनवर सावकार आला ताळ्यावर : 06 वर्षांपूर्वी लिहून घेतलेली जमीन केली शेतकऱ्याला परत !

कर्जतच्या पोलिस निरीक्षकांमुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात तरळले आनंदाअश्रू !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  व्याजाने दिलेल्या पैशांच्या बदल्यात सावकाराने (moneylender) लिहून घेतलेली जमीन सहा वर्षांनी पुन्हा परत मिळेल का? असा जर प्रश्न कुणी विचारला तर याचं उत्तर नक्कीच नाही असेच मिळेल. पण कर्जतच्या पोलिस निरीक्षकांमुळे हातातून गेलेली जमीन एका शेतकऱ्याला परत मिळाली अन् या कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात आनंदाअश्रू तरळले. कर्जत तालुक्यातील दुरगाव (Durgaon in Karjat taluka ) येथील या घटनेने कर्जत पोलिसांच्या कार्याचे सर्वच स्तरातुन कौतुक केले जात आहे. (land written by the lender was returned to the farmer after 06 years in karjat taluka)

याबाबत माहिती अशी, सिकंदर नुर मोहम्मद शेख (रा.दुरगाव ता.कर्जत) या शेतकऱ्याला सन २०१६ साली नोटबंदीनंतर आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागला.आर्थिक संकट आल्याने त्यांनी दुरगाव येथील सावकाराकडुन ३ लाख रुपयांची रक्कम ३ रु.टक्के व्याजदराने घेतली होते.या रकमेच्या बदल्यात तक्रारदार सिकंदर शेख यांची जमीन पैसे दिल्यानंतर परत करून देण्याच्या बोलीवर सावकाराने स्वतःच्या नावे करून घेतली होती.

७ लाख रुपये दे तरच मी तुला जमीन परत देईल

शेख यांनी घेतलेल्या ३ लाखांपैकी सन २०१७ साली व्याजापोटी १ लाख रु. व मुद्दल ५० हजार अशी १ लाख ५० हजार रक्कम सावकाराला दिली होती. परंतु मधल्या काळात आर्थिक अडचणींमुळे तक्रारदार सावकाराला पैसे देऊ शकले नाहीत.सन २०२१ साली तक्रारदार शेख यांनी सावकाराला भेटुन ‘माझी परीस्थिती खुप हालाखीची आहे,मी तुम्हाला सध्या मुद्दल देतो व व्याजाचे पैसे नंतर देतो’ अशी विनवणी केली मात्र ‘तु मला मुद्दल आणि त्याचे व्याज असे ७ लाख रुपये दे तरच मी तुला जमीन परत देईल किंवा मी तुला थोडे पैसे देतो ही जमीन मलाच राहु दे, हा व्यवहार इथेच मिटून टाक’ असे सावकार म्हणाला होता.

फोन कॉलने सावकाराचे भान आले जागेवर

सिकंदर शेख हे अल्पभुधारक असल्याने व जमीनीचा भाव पाडून मागत असल्याने शेख यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास होत होता.सिकंदर शेख यांनी कर्जत पोलिस स्टेशनला येऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना भेटुन सर्व हकीगत सांगितली. सर्व हकीगत ऐकून घेत पोलीस निरीक्षक यादव यांनी सावकाराला फोनकॉल केला ‘तु तक्रारदार शेख यांची जमीन परत करतो का?नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल होईल’ या फोन कॉलने सावकाराचे भान जागेवर आले.

माझ्यावर गुन्हा दाखल करू नको

सावकाराने सिकंदर शेख यांना फोन करून बोलावुन घेतले व ‘मी तुझी जमीन परत करतो,तु मला व्याज वगैरे देऊ नकोस फक्त माझी मुद्दल दे पण माझ्यावर गुन्हा दाखल करू नको’ असे सावकार म्हणू लागल्याने सिकंदर शेख यांनी मुद्दल देण्यास तयार झाले. त्यानंतर सिकंदर शेख यांनी सावकाराला अडीच लाख रुपये देऊन परत ती जमीन आपल्या नावे करून घेतली आहे. संबंधित जमिनीची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे १५ लाख एवढी आहे.कर्जत पोलिसांच्या या कामगिरीने आता सर्वसामान्यांना न्याय मिळत असल्याने त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

…तर ही जमीन पुन्हा मिळालीच नसती

‘जमीन सावकाराच्या नावावर लिहून देऊन बराचसा कालावधी उलटून गेला होता.आणि घेतलेल्या रकमेवरही व्याजाच्या पैशांचा डोंगर वाढला होता त्यामुळे ही जमीन परत मिळेल असे वाटले नव्हते मात्र पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यामुळे न्याय मिळाला असुन त्यांचे व पोलिस विभागाचे आम्ही आभार मानतो अशी प्रतिक्रिया शेख कुटुंबीयांनी दिली आहे.

 

News by डाॅ अफरोज पठाण, कर्जत