कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर | Karjat Nagar Panchayat Mayor Reservations Announcing

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | राज्यात गाजलेल्या कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत गुरूवारी जाहीर झाली.येथील नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाले आहे. मुंबई येथे झालेल्या आरक्षण सोडतीत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.

कर्जत नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादी विरूध्द भाजप संघर्षाने राज्यात गाजली होती. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीत काट्याची टक्कर होईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतू कर्जतकर जनतेने भाजपला सत्तेतून पायउतार करत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत बहाल केले केले. या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत नगरपंचायतवर कब्जा मिळवला.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 19 जानेवारीला लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक 12 जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले. त्या खालोखाल काँग्रेसने 3 जागा जिंकल्या. त्यानुसार आघाडीकडे 15 चे संख्याबळ झाले. तर भाजपला अवघ्या 2 जागा मिळाल्या. 17 पैकी 11 जागांवर महिला नगरसेविकांची वर्णी लागली होती. नगरपंचायतवर महिला राज येणार का ? याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या.

कर्जत नगरपंचायतवर महिलाराज

गुरूवारी नगराध्यक्षपदाची सोडत मुंबईत पार पडली आणि नगरपंचायतवर महिलाराज येणार हे जवळपास स्पष्ट झाले. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. यामुळे आता नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पहिल्यांदा संधी कोणाला ?

कर्जत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीकडे सर्वाधिक 12 नगरसेवक आहेत, त्यात 7महिला सदस्य आहेत. काँग्रेसकडे 3 संख्याबळ आहे. त्यात 2 महिला नगरसेवक आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी मिळवून 15 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. यामध्ये 9 महिला नगरसेविका आहेत. 9 महिला नगरसेविकांपैकी कोणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आमदार पवार कोणाला संधी देणार ?

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतवर महिलाराज येणार आहे. येथील नगराध्यक्ष निवडीत आमदार रोहित पवार कोणाला संधी देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.