कर्जत : बाजार समितीच्या निवडणुकीत कोणत्याही नेत्याचा वशिला चालणार नाही, निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी – आमदार प्रा राम शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत बाजार समिती समिती निवडणूकीसाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी अर्थात आमदार रोहित पवारांच्या पॅनलला धुळ चारण्यासाठी शिंदे यांनी जोरदार फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून गुरूवारी रात्री कर्जत तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आमदार राम शिंदे यांनी बैठक घेतली. ही बैठक सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार राम शिंदेंना फोन आला. यावेळी फडणवीस यांनी कर्जत बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे फोनवरून संवाद साधत अवाहन केले.

Karjat Bazar Samiti elections will not be influenced by any leader, candidates who have the ability to be elected should be nominated - MLA Ram Shinde

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियोजनाच्या दृष्टीने आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत रेहकुरी येथील विश्रामगृहात गुरूवारी रात्री कर्जत तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष डाॅ सुनिल गावडे, अल्लाउद्दीन काझी, प्रकाश शिंदे, सचिन पोटरे, बाप्पूसाहेब नेटके मेजर, पप्पूशेठ धोदाड, बाळासाहेब शिंदे, माणिक जायभाय, तात्या खेडकर, बापूराव शेळके,प्रकाश शिंदे, मंगेश दादा जगताप, दादा सोनमाळी,सुनील काळे, पांडुरंग भंडारी, अजित अनारसे, हनुमंत नवसरे, संतोष निंबाळकर, राहुल गांगर्डे ,शिवाजी वायसे, संभाजी बोरूडे, अनिल गदादे सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात आपला सत्ता आहे, मी पण आमदार झालोय, आता काय अडचण राहिलीय का कोणाला ? आत्ता फक्त तुम्हाला जिंकून यायचयं, त्यासाठी जे आपल्याकडं पाहिजे होतं ते आलयं, त्यामुळे मला वाटतं,आता कसली अडचण येणार नाय, मागील वेळी मार्केट कमिटी बिनविरोध करायचं ठरलं, त्यादृष्टीने सर्व जण बसले, पण निवडणूक बिनविरोध निघाली नाही, निवडणूक झाली आणि आपलीच सत्ता आली. पण आता यावेळेस निवडणूकीची रणनिती एकदम वेगळी आहे, त्यामुळं इतके सर्वे चालूयेत, कोण माणूस कुठं बसतोय? कोण माणूस कुठं उठतोय? त्याला आपण 20 जूनच्या नंतर पाहिजे तसं चोख उत्तर दिलयं, त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत मागे नाही, असे सांगत राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.

Karjat Bazar Samiti elections will not be influenced by any leader, candidates who have the ability to be elected should be nominated - MLA Ram Shinde

शिंदे पुढे म्हणाले की, कर्जत बाजार समिती निवडणूकीत आपल्या पॅनलकडून उमेदवारीसाठी मागणी जास्त असणार आहे, पण उमेदवारी देताना कुठल्याही नेत्याचा वशिला चालणार नाही, मतदाराला काय वाटतं याच्यावर आपल्याला उमेदवार ठरवावे लागणार आहेत,निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाईल,बाजार समितीत आपलीच सत्ता येणार आहे. पण गाफील राहून चालणार नाही, आजच्या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येकाने सोसायटी आणि ग्रामपंचायतचे पाच – पाच मते जरी आणली,तरी आपण बाजी मारू, असे सांगत सर्व कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

बैठकीत कार्यकर्ते काय म्हणाले ?

नवीन माणसं जोडावीत, कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावं, असे संपत बावडकर म्हणाले, तर उदयसिंग परदेशी म्हणाले की, राम शिंदे साहेब विधानपरिषदेचे आमदार झाले आणि विरोधकांना उतरती कळा लागली.अनेक गावातील चेअरमन विरोधी पक्षाचे असले तरी संचालक मात्र आपल्या विचाराचे आहेत, त्यांचा सर्वे करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

Karjat Bazar Samiti elections will not be influenced by any leader, candidates who have the ability to be elected should be nominated - MLA Ram Shinde

मागच्या वेळेस आपला विजय झाला होता, यंदा मात्र विरोधक वेगळा असल्याने जिल्हा बँक जशी जिंकली तशीच बाजार समितीची निवडणूक जिंकावी लागेल. आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून काम करावं लागेल. मतदार यादीत एखाद्या कार्यकर्त्याचे नाव नसेल, पण त्याच्यामुळे जर आपल्या पॅनलला मदत होत असेल तर त्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी लागेल अशी भूमिका काका धांडे यांनी मांडली.

माणिक आप्पा जायभाय म्हणाले, निवडणुकीला सामोरे जाताना अधिक खबरदारी घ्यावी लागेल,  आपल्याच पॅनलला मतदान करा, मला उमेदवारी करायची नाही, सर्व जण एकजुटीने निवडणुकीला सामोरे जावूया, असे जायभाय म्हणाले.

उमेदवारांला वैयक्तिक मते खेचून आणता आली पाहिजे, जास्तीत जास्त मतदान खेचून आणायला आम्ही तयार आहोत. संख्यात्मक डाटा आपल्याकडे आहे, त्यानुसार आपण पुढे आहोत, परंतू दक्षता घेणे अधिक आवश्‍यक आहे. स्थानिक विरोध बाजूला ठेवून आपल्या पॅनलसाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. बाजार समिती ही ऐकमेव जिवंत संस्था आहे, या संस्थेत काम करायला अधिक संधी आहे. काम करणाराला संधी द्यावी, अशी भूमिका शेखर खरमारे यांनी मांडली.

आमदार राम शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर सर्वांनी उभं रहावं, आपल्या मतदार संघावर जे परकीय अतिक्रमण झालेय त्याला थोपवण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी असे अवाहन संतोष निंबाळकर यांनी केले.

शिंदे साहेब आमदार झाले आणि राज्यात सरकार आलं त्यानंतर वातावरण बदललं आहे. नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांनी दबाव आणि दडपशाही केली, त्याचा फटका आपल्याला बसला, विरोधकाला कमी न समजता आपल्याला नव्या रणनितीने पुढे जावं लागेल. टार्गेट समजून आपल्याला निवडणूक लढवावी लागेल. उमेदवारी न मिळाल्यास कोणी तोंड न फिरवता पक्षासोबत एकनिष्ठ रहावे. एकाच भागातील उमेदवारांनी एकत्र येऊन पॅनलला धोका करू नये. सर्वांनी पॅनल टू पॅनल ठरवलं तर आपण यश खेचून आणू शकू. आपलं सरकार आहे. आता अधिकारी आपल्याशी नीट वागतील.

यावेळी बोलताना सचिन पोटरे म्हणाले की, एक वर्षापुर्वीच आपली नगरपंचायतची निवडणूक झाली. काळ बदलायला जास्त काळ लागत नाही, काळ बदलला,आता रामराज्य आलयं, आणि आता कोणाची दुकानं बंद व्हायची शक्यता अजिबात राहिलेली नाही, त्यामुळे आता भीती दडपण आजिबात ठेवायचं नाही. मागच्या वर्षी याच दिवशी राम शिंदे साहेब गोदड महाराजांच्या मंदिरासमोर मौन अंदोलनास बसले होते. त्यावेळी विरोधकांची दहशत होती, सत्ता होती, आता सगळं बदललयं, आता रामराज्य आलयं, राम शिंदे साहेब ज्या ज्या उमेदवाराला संधी देतील त्याला निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने झपाटून काम करावे, असे अवाहन केले.

अशोक खेडकर म्हणाले की, कर्जत-जामखेड मतदारसंघात परिवर्तन होणार आहे याची खात्री देण्यासाठी मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्यांची निवडणूक महत्वाच्या आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी झपाटून काम करावं, कोणी दगाफटका करणार नाही याची काळजी घ्यावी, नावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी कोणी उमेदवारी मागू नये, अशी विनंती यावेळी खेडकर यांनी कार्यकर्त्यांना केली.

अल्लाउद्दीन काझी म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावं, बाजार समितीवर आपलाच झेंडा फडकेल यासाठी सुक्ष्म नियोजन करावं, बाजार समितीची निवडणूक आमदार राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकायची असा निर्धार करूया,असं ते म्हणाले.