Jamkhed Panchayat Samiti Corona vaccine lucky draw scheme | जामखेड पंचायत समिती लकी ड्रॉ योजना : कोरोना लसीचा पहिला डोस घ्या अन् जिंका

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Jamkhed Panchayat Samiti Corona vaccine lucky draw scheme | देशात ओमिक्रॉन या कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकारी यंत्रणांनी लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवण्यास सुरूवात केली आहे. काही भागात कठोर नियम करण्यात आले आहेत. मात्र जामखेड तालुक्यात कोरोना लसीकरणात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी पंचायत समितीने देशाचे नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक योजना लाँच केली आहे.

जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागाचे 72 टक्के लसीकरण पूर्ण झालेले आहे. परंतु अद्यापही 26 टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लस घेण्याबाबत गैरसमज दिसून येतात. प्रशासन लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र त्याला म्हणावे तेवढे यश मिळत नाही. त्यामुळे पंचायत समिती जामखेडने लकी ड्रॉ चे आमिष दाखवून नागरिकांना लसीकरणात आकर्षित करण्याची योजना हाती घेतली आहे.

काय आहे लकी ड्रॉ योजना ?

ज्या नागरीकांचा लसीचा पहिला डोस राहिलेला आहे त्यांनी लस घेतल्यास त्यांना टीव्ही, फ्रिज, पिठाची गिरणी, कुकर, मिक्सर, पंखा अशी जवळपास 70 बक्षिसे जिंकण्याची संधीआहे. पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी यांनी लोकसहभागातून ही बक्षीस योजना सादर केलेली आहे. 12 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत लसीकरण करून घेणाऱ्यांना (फक्त पहिला डोस) ही संधी उपलब्ध आहे. 1 जानेवारी 2022 रोजी पंचायत समिती जामखेड येथे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या लकी ड्रॉ स्पर्धेची सोडत  होईल.

नागरिकांना खालील बक्षिसे जिंकण्याची संधी

प्रथम बक्षीस- फ्रीज, द्वितीय- पिठाची गिरणी, तृतीय- LED TV, चतुर्थ- पंखा-५, पाचवे- मिक्सर ५, सहावे- कुकर ५, सातवे- इस्त्री ५, आठवे- टिफिन २० अशी एकूण ४३ बक्षिसे दिली जाणार आहेत.

यांच्या पुढाकारातून लकी ड्रॉ योजना

या उपक्रमासाठी आ. रोहितदादा पवार, सभापती राजश्री मोरे, उपसभापती मनीषा सुरवसे, पं.स. सदस्य डॉ. भगवान मुरूमकर, प्रा. सुभाष आव्हाड, जि.प. सदस्या वंदना लोखंडे, सोमनाथ पाचरणे यांनी मदत केली. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.

100% लसीकरण होण्यासाठी जनतेने पुढे यावे

जामखेड तालुक्यात कोरोनाचे लसीकरण वेगाने होऊन तालुक्यातील सर्व नागरिकांनी लसीचा पहिला डोस घ्यावा. कुठलेही गैरसमज बाळगू नयेत. पंचायत समितीने हाती घेतलेल्या उपक्रमाचा लाभ घेऊन सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे अवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी केले आहे.