धक्कादायक: जामखेड तालुक्यात बिबट्याचा मृत्यू, मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने उडाली मोठी खळबळ!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील धामणगाव परिसरात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.(Death of Leopard in Jamkhed Taluka)

जामखेड तालुक्यात खर्डा भागातील बालाघाट डोंगर रांगेच्या परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत होते. वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी अनेकदा पिंजरे लावण्यात आले होते. नायगाव, धामणगाव, खर्डा, आदी भागात बिबट्याने पाळीव आणि वन्य प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या होत्या.

परंतू मागील काही महिन्यांपासून बिबट्याच्या हालचाली मंदावल्या होत्या, बिबट्याचे दर्शन झाले नव्हते. मात्र आता नर जातीचा बिबट्या धामणगावात मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बालाघाटात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित झाले आहे.

धामणगाव येथील वनविभागाच्या वनदरा हद्दीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. या भागात मादी बिबट्या पण असु शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध रहावे असे अवाहन धामणगावचे सरपंच महारूद्र महारनवर यांनी केले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वनविभागाची पुढील कार्यवाही सुरू आहे अशी माहिती वनपाल उबाळे यांनी दिली.