जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संविधानात नमूद केल्याप्रमाणे महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक मिळावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहावे. एकविसाव्या शतकाचा विचार करता महिला विविध क्षेत्रात अग्रेसर होताना दिसत आहेत. आपल्या कृषि महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी देखील उंच भरारी घेऊन यशाची सर्वोच्च शिखरे पादांक्रांत करावी व महाविद्यालयाचे नाव मोठे करावे, अशी अपेक्षा हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी व्यक्त केली.
जामखेड तालुक्यातील हळ गाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. यावेळी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनावणे, प्रा. पोपट पवार, डॉ. मनोज गुड, डॉ. नजिर तांबोळी, डॉ. निकिता धाडगे, डॉ. प्रणाली ठाकरे, प्रा. अर्चना महाजन आणि डॉ. उत्कर्षा गवारे सह आदी उपस्थित होते.
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी प्रतिनिधी कु. सोनाली इंगोले हिने लिंग समानतेचा मुद्या आपल्या मनोगतातून व्यक्त केला. महाविद्यालयातील सफाई कर्मचारी सौ. अनिता कांबळे यांनी महिला दिनाचे महत्व पटवून दिले. प्रा. अर्चना महाजन यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचा गौरव करत, विद्यार्थीनींनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या युगात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान, महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका व सफाई कर्मचार्यांना गौरवण्यात आले. नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेच्या पुढाकारातून ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन हाळगाव कृषि महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संस्कृती निथळे तर आभारप्रदर्शन कु. सायना सय्यद यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.