कर्जत नगरपंचायत निवडणुकीत तिघांचे अर्ज बाद , आता उमेदवारी कोण मागे घेणार याकडे लागले लक्ष

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 4 जानेवारी | कर्जत नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणूकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विक्रमी 28 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज छाननी झाली.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे कर्जत नगरपंचायतमधील चार प्रभागातील निवडणूक रद्द झाली होती. मात्र या जागांवर आता खुल्या वर्गातून निवडणुका घेतल्या जात आहेत. कर्जत नगरपंचायतमध्ये पहिल्या टप्प्यात13 जागांसाठी मोठ्या चुरशीच्या वातावरणात निवडणूक पार पडली होती. पहिला टप्पा विविध कारणांनी राज्यभर गाजला. आता दुसरा टप्प्यात काय होणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान 3 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. चार जागांसाठी 28 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. आज 4 जानेवारी रोजी अर्ज छाननी पार पडली यामध्ये तीन अर्ज बाद करण्यात आले आहेत. रघुनाथ किसन ढेरे यांचा प्रभाग 3 मधून अर्ज बाद झाला आहे. तर शितल बबन फुले व जनाबाई लक्ष्मण गायकवाड यांचा प्रभाग एक मधून अर्ज बाद झाला आहे.

दरम्यान पहिल्या टप्प्यात उमेदवारी मागे घेण्यावरून मोठे राजकीय नाट्य आरोप प्रत्यारोप घडले होते. दुसऱ्या टप्प्यातील चार जागांसाठी 25 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता माघार घेण्याच्या दिवशी कोण कोण माघार घेणार? पुन्हा दबावतंत्राचा वापर होणार का ? दबावतंत्राविरोधात कर्जतकर एकवटणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी हा संघर्ष उफाळून आला आहे. भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे तर राष्ट्रवादीकडून रोहित पवार हे किल्ला लढवत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय हवा बदललीय का ? याचीच परिक्षा या निवडणुकीत होणार आहे.पवार व शिंदे या दोन्ही नेत्यांची कसोटी या निवडणुकीत लागली आहे.