BulliBai App Case Big news : बुल्ली बाई ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, बंगळूरमधून 21 वर्षीय तरुण ताब्यात

BulliBai App Case news | जामखेड टाईम्स वृत्तसेवा | 4 जानेवारी | बुल्ली बाई या ॲप द्वारे देशातील शेकडो  मुस्लिम महिलांचे फोटो वापरून आक्षेपार्य मजकुर टाकून या फोटोंचे ऑनलाईन लिलाव केल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने वेगवान तपास केला. या प्रकरणात एका 21 वर्षीय तरूणाला मुंबई पोलिसांनी बंगळूर मधून ताब्यात घेतले आहे.या कारवाई बाबत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही दुजोरा दिला आहे.

देशातील मुस्लिम महिला, मुस्लिम पत्रकार, मुस्लिम कार्यकर्त्या अश्या प्रसिध्द महिलांचे फोटो बुल्ली बाई ( Bulli Bai) या ॲपवर अपलोड करून त्यावर आक्षेपार्य मजकुर टाकण्यात आला होता. या फोटोंचा ऑनलाईन लिलावही लावण्यात आला होता. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हे प्रकरण बाहेर आल्याने देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून गेल्या दोन दिवसांपासून मोठे वादळ उठले आहे.

बुल्ली बाई ॲपवर देशभर गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातही शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तक्रार दाखल केली होती. तसेच या संपुर्ण प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत तातडीने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाला सोमवारी मोठे यश मिळाले.(BulliBai App Case news, 21-year-old arrested from Bangalore by Mumbai Police)

ANI वृत्तसंस्थेनुसार,  बुल्ली बाई’ ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी बेंगळुरू येथून ताब्यात घेतलेल्या संशयिताचे वय वगळता त्याची ओळख अद्याप उघड केलेली नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे असे AIN ने ट्विट केले आहे.

मुंबई पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईचे देशभरातून कौतूक होत आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी पकडलेल्या 21 वर्षीय तरूणाची ओळख जाहीर करण्यात आली नाही. मुंबई पोलिसांनी बंगळूर मधून ताब्यात घेतलेला तरूण हा इंजिनिअरींगचा विद्यार्थी आहे. या प्रकरणाला पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. संबंधित तरूणाला बंगळूर हून मुंबईला आणले जात आहे. मुंबईत आणल्यानंतर त्याला अटक केली जाईल. दरम्यान बुल्ली बाई ॲप चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश होईल का? याचीच उत्सुकता देशाला लागली आहे.

‘बुल्ली बाई’ ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. तपशील उघड करू शकत नाही कारण त्यामुळे चालू असलेल्या तपासात अडथळा येऊ शकतो, मी सर्व पीडितांना खात्री देऊ इच्छितो की आम्ही गुन्हेगारांचा सक्रियपणे पाठलाग करत आहोत आणि ते लवकरच कायद्याला सामोरे जातील.

सतेज ऊर्फ बंटी पाटील गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र

मुंबई पोलिसांनी अवघ्या 48 तासांत बुल्ली बाई ऐप प्रकरणात एका 21 वर्षीय तरूणाला बंगलोर येथून ताब्यात घेतलं आहे. या कारवाईची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटरवरुन दिली आहे. 

दरम्यान ज्या मुस्लिम पत्रकार, विचारवंत, कार्यकर्त्यांच्या फोटोंचा वापर करून बुल्ली बाई ॲपच्या माध्यमांतून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यातील अनेक महिलांनी समोर या प्रकरणावर उघडपणे आवाज उठवला आहे. अनेकांनी वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देत देशाच्या जनतेशी संवाद साधला, सोशल मिडीयाच्या माध्यमांतून आवाज उठवला आहे. सोमवारी दिवसभर सोशल मिडीयावर या महिलांच्या समर्थनार्थ लाखो लोक लिहीत होते. लाखो लोकांनी महिलांच्या लढ्याला पाठिंबा देण्यास सुरूवात केली आहे.