कर्जत-जामखेड मतदारसंघात रोजगार हमीतून विक्रमी ५११२ कामे पुर्ण, २१ कोटींचा निधी खर्च – आमदार रोहित पवार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाची ५ हजाराहून अधिक कामे कर्जत – जामखेड मतदारसंघात पुर्ण करण्यात आली आहेत, यासाठी मतदारसंघात २१ कोटींचा निधी खर्च झाला, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

In Karjat Jamkhed Constituency record 5112 works have been completed under  Employment Guarantee Scheme, 21 Crores have been spent - MLA Rohit Pawar

कर्जत-जामखेड मतदारसंघात रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून दोन्ही तालुक्यात अनेक कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. यात दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, दोन्ही तालुक्यांचे बीडीओ, कृषी अधिकारी आणि त्या-त्या विभागांचे सर्व कर्मचारी तसेच पदाधिकारी, रोजगार सेवक, समन्वयक या सर्वांच्या समन्वयाने रोजगार हमी योजने अंतर्गत करावयाच्या विविध कामांचे नियोजन करण्यात आले होते. या नियोजनामुळे कर्जत-जामखेड हे दोन्ही तालुके ‘रोहयो’ अंतर्गत केलेल्या कामांमध्ये जिल्ह्यात आघाडीवर आहेत.

रोहयेतून जामखेड तालुक्यात १०.८५ कोटी रुपयांची कामे

रोजगार हमी योजनेच्या माध्यमांतून शाळेला संरक्षक भिंत बांधणे, गायगोठा, शेळी पालनाचे शेड, कुक्कुटपालनाचे शेड, फळबाग, शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड, विहीरी, शोषखड्डे, घरकूल ही कामे करण्यात आली, यासाठी जामखेड तालुक्यात १०.८५ कोटी रुपयांचा निधी तर कर्जत तालुक्यात ९.९५ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला.तसेच मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत पेव्हिंग ब्लॉक टाकण्यात आले आणि रस्तेही करण्यात आले असून आता ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीही बांधण्यात येणार आहेत अशी माहिती पवार यांनी दिली.

जामखेड तालुक्यात 15 दिवसात मजुरांना पैसे दिले जातात.

रोहयोच्या माध्यमांतून मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आणि अधिकाधिक सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे करण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रशासनाकडून त्यासाठी मोठे सहकार्य मिळत असल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे करता आली. अहमदनगर जिल्ह्यात केवळ जामखेड तालुक्यात 15 दिवसात मजुरांना पैसे दिले जातात. रोजगार हमीचे कामे मतदारसंघात प्रभावीपणे राबवल्यामुळे जामखेड तालूका नाशिक विभागात पाचव्या तर कर्जत तालुका सातव्या स्थानी आहे. भविष्यातही प्रत्येक योजनेचा मतदारसंघातील जनतेला अधिकाधिक फायदा व्हावा, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे असे यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

कर्जत-जामखेड मतदारसंघात पूर्ण झालेली कामे

  • शाळेला संरक्षक भिंत बांधणे – ३५,
  • गायगोठा – ११७५,
  • शेळीपालन शेड – ६०,
  • कुक्कुटपालन शेड – २४,
  • फळबाग – २१८०,
  • शेततळे – ५०,
  • रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड – ६१,
  • विहिरी – १३०,
  • शोषखड्डे – १५००,
  • एकूण कामे – ५११२