शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाने जारी केला येलो अलर्ट

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ।  गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. परंतू पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

Important news for  farmers, Meteorological department has issued yellow alert warning of heavy rainfall in Ahmednagar district for the next three days

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पुढील चार दिवसांचा हवामान अंदान जाहीर केला आहे. यामध्ये ७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी बांधवांनी शेतातील कामे उरकून घ्यावीत असे अवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रवरा नदीत ओझर बंधारा २१८ क्यूसेस, गोदावरी नदीत नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १६१४ क्यूसेस व जायकवाडी धरणातून २०९६ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ४५२१ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून २७०० क्युसेस, सिना नदीत सिना धरणातून १५७ क्यूसेस, मुळा नदीस मुळा धरणातून ५४५ क्यूसेस आणि कुकडी नदीस येडगाव धरणातून ४५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत ५८३.६ मि.मी (११३.० %) पर्जन्यमान झालेले आहे. हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

अहमदनगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरु असून अतिवृष्टी झाल्यास धरणाद्वारे सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये.

तसेच जुनाट व मोडकळीस आलेल्या  धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्याऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.

धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये.अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवितास धोका उद्भभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा.

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्थानक यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४, २३५६९४० वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी केले आहे.