जामखेड ब्रेकिंग : विजेचा शाॅक बसल्याने 32 वर्षीय तरूणाचा मृत्यू !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील जमदारवाडी येथील एका 32 वर्षीय तरुणाचा विजेचा शाॅक बसल्याने मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना आज घडली.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

32-year-old man died due to electric shock in Jamdarwadi, jamkhed times breaking news,

याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील जमदारवाडी येथील अविनाश ऊर्फ बालाजी मारूती आजबे हा 32 वर्षीय तरूण बटेवाडी येथील कांतीलाल अंबादास भिसे यांच्या घरासमोरील विजेच्या पोलवर चढला होता. मात्र विजेचा शाॅक लागल्याने तो पोलवरून खाली पडला, ही घटना आज  सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

विनोद टकले यांनी मयत अविनाशचे चुलते हरिभाऊ आजबे यांना घटनेबाबत फोनवरून माहिती दिली, की अविनाश हा विजेच्या खांबावरून खाली पडला आहे, त्याला लवकर दवाखान्यात घेऊन जा, त्यानंतर घटनास्थळी हरिभाऊ आजबे तातडीने आले.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर आजबे यांनी लोकांच्या मदतीने अविनाश याला खाजगी रिक्षातून उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू डाॅक्टरांनी तपासले असता रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच अविनाश याचा मृत्यू झाला होता, असे डाॅक्टरांनी घोषित केले.

अविनाश आजबे हा नगरपरिषदेच्या स्टेट लाईट ठेकेदाराकडे कामाला होता, नेहमीप्रमाणे तो कामावर गेला होता. नगरपरिषद हद्दीतील बटेवाडीतील विजेच्या पोलवरील LED बल्ब बदलत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो पोलवर खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीत विजेचे काम करताना दत्तात्रय वीर आणि हुसेन शेख यांच्याबाबत यापुर्वी अश्याच स्वरूपाच्या घटना घडल्या होत्या, सुदैवाने हे दोघे बचावले मात्र त्यांना कायमच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. या दोघांना कुठलीही शासकीय मदत अद्याप मिळालेली नाही. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जामखेड ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली. नातेवाईक आणि मित्रांच्या आक्रोश रुग्णालय परिसरात दिसून येत आहे. मयताची शवविच्छेदन करण्याचे काम सध्या ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानदेव भागवत हे करत आहेत.

अविनाश आजबे या तरूणाच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अविनाश हा अतिशय मनमिळावू स्वभावाचा तरूण होता.