कोल्हापुरातील हुपरी नगरपरिषदेचा ऐतिहासिक निर्णय, तृतीयपंथीयाची केली स्वीकृत नगरसेवकपदी निवड

कोल्हापूर : विधवा प्रथा बंदीचा क्रांतिकारक निर्णय घेवून कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने राज्यासमोर आदर्श घालून दिला होता.यानंतर असाच आणखी एक ऐतिहासिक निर्णय कोल्हापुरातील एका नगरपरिषदेत घेण्यात आला आहे. (historic decision of Hupari Municipal Council in Kolhapur, election of transgender accepted as corporator)

राज्यात पहिल्यादाच तृतीयपंथीयाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचा निर्णय हुपरी नगरपरिषदेने घेतला आहे. तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने राहता यावे यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबवल्या जात आहेत. इतर व्यक्तीप्रमाणे त्यांनाही सन्मानाने जगता यावे तसेच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यातच राजकारणातही तृतीयपंथीयाना स्थान देवून कोल्हापुरातील हुपरी नगरपरिषदेने राज्यासमोर आदर्श घालून दिला आहे.

हुपरी नगरपरिषदेने एका तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक बनवले आहे. तातोबा बाबूराव हांडे ऊर्फ देव आई असे त्यांचे नाव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात तातोबा हांडे यांच्या रूपाने प्रथमच तृतीय पंथीयास प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान आमदार प्रकाश आवाडे प्रणीत कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीने मिळवून दिला आहे.

ताराराणी आघाडीचे तत्कालीन स्वीकृत नगरसेवक प्रकाश बावचे यांनी पदाचा कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा दिल्यामुळे या पदावर निवड होण्यासाठी आज नगरपरिषद सभागृहात खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट होत्या.

Ajit Pawar Birthday
जाहिरात

आवाडे गटातर्फे या पदावर आपली निवड व्हावी यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, ताराराणीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी इतर इच्छुकांची नावे बाजूला करत संपूर्ण परिसरात देव आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या तातोबा हांडे यांच्या नावास पसंती दर्शवली.

तातोबा हांडे ऊर्फ देव आई रेणुका भक्त म्हणून ओळखले जातात. परिसरात त्यांचा मोठा भक्तगण आहे. त्यांनी नगरपरिषदेची पहिली निवडणूक ताराराणी आघाडीकडून लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र कागद पत्रातील काही त्रुटींमुळे त्यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला होता.

त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी तातोबा हांडे उर्फ देवी आई यांना स्वीकृत नगरसेवक करण्याचा शब्द दिला होता त्याची आज आवाडे यांनी पूर्तता केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, नगरसेवक सुरज बेडगे, बाळासाहेब रणदिवे, उदय पाटील आदी उपस्थित होते.