अवघ्या तीन महिन्यांत करोडो रूपयांचा निधी आणला –  खासदार डाॅ.सुजय विखे पाटील

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ।  केंद्रात आणि राज्यात  सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार सत्तेत आहे. अहमदनगर जिल्ह्याचा विकास हेच आपले ध्येय असून राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत विकासाची गंगा आपल्या दारी आणली, असे सांगत ज्यांनी मागील तीन वर्षांत एक रूपायाही आणला नाही ते आता  आम्ही आणलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी उतावीळ झाले आहेत, असे म्हणत अहमदनगर दक्षिणचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला.

Funds worth crores of rupees were brought in just three months - MP Dr. Sujay Vikhe Patil

खासदार डॉ.सुजय विखे-पाटील आणि माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ सोमवारी पार पडले. यावेळी खासदार विखे बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना खासदार विखे म्हणाले की 2019च्या लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला घरोघरी स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा शब्द दिला होता, हाच शब्द त्यांनी पाळला असून जलजीवन मिशन या योजनेंतर्गत आता देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी त्यांनी दिले आहे. आपल्या जिल्ह्य़ात या योजनेंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन हजार कोटी रूपयांच्या योजनेचे काम सुरू आहेत.पुढील सहा महिन्यात सर्व योजना कार्यान्वित होतील असे विखे म्हणाले.

येणाऱ्या काळात आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी तसेच शिंदे-फडणवीस सरकार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन विखे यांनी केले. यावेळी माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे यांचेही भाषण झाले.

या प्रसंगी अंबादास मिसाळ, सुनील गावडे ,श्रीधर पवार अशोकराव खेडकर , रवींद्र कोठारी, धनंजय मोरे तात्यासाहेब माने, साहेब काजी, युवराज शेळके ,सचिन पोटरे , स्मिता अनारसे जीवन साळुंखे, प्रशांत बुद्धिवंत गणेश क्षीरसागर सुनील यादव, अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.