मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले अनेक महत्वपूर्ण निर्णय
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले. जाणून घेऊयात.
देशभरात पहिल्या टप्प्यात 15 हजाराहून अधिक शाळा उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून विकसित करण्यात येणार असून यात महाराष्ट्रातील 846 शाळांचा समावेश करण्यात येईल.पीएम श्री योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासमवेत सामंजस्य करार केला आहे.
या करारानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्यात लागू करण्यात येईल. पीएम श्री योजनेत केंद्राचा 60 टक्के हिस्सा असेल.प्रत्येक शाळेसाठी 1 कोटी 88 लाख एवढी तरतूद 5 वर्षांसाठी करण्यात येईल. या शाळांसाठी 5 वर्षांकरिता केंद्राचा हिस्सा 955 कोटी 98 लाख राहणार असून राज्याचा 40 टक्के हिस्सा प्रती शाळा 75 लाख प्रमाणे 634 कोटी 50 लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात 408 गट,28 महानगरपालिका आणि 383 नगरपालिका व नगरपरिषदा यामधून पीएम श्री शाळांची निवड केली जाईल.
या शाळांमधून अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देण्यात येईल. विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील त्याचा ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मुल्यांकन करण्यात येईल. या शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेऊन विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करण्यात येईल. काही कारणांमुळे विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात येईल.
या शाळांचा विकास प्रामुख्याने पुढील 6 प्रमुख आधार स्तंभांवर केला जाईल.
अभ्यासक्रम, आध्यापन शास्त्र व मुल्यमापन; प्रवेश आणि पायाभूत सुविधा; मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व; समावेशक पद्धती आणि लाभार्थी समाधान; व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन; लाभार्थी समाधान. या योजनेची अंमलबजावणी राज्य स्तरावरून शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती आणि महापालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समित्यांमार्फत केली जाईल. राज्य प्रकल्प संचालक हे राज्य अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असतील.
धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 15 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, एक हजार कोटी रुपये खर्चास मान्यता
राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी १ हजार कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना होईल.नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती.
2022-23 या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी 15 हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.ही रक्कम 2 हेक्टर मर्यादेत देण्यात येईल.मागील म्हणजे 2021-22 खरीप हंगामात 1 कोटी 33 लाख 79 हजार 892 क्विंटल धान खरेदी झाली होती.पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती.
या पूर्वीच्या खरीप हंमागामध्ये धान उत्पादकांना प्रती क्विंटल 700 रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली आहे.मात्र ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या.ज्या शेतकऱ्यांकडे 50 क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे अशांच्या नावे 50 क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग घडले. तसेच शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
यंदा 2022-23 योजनेकरिता सुमारे 5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता
महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता देण्याचा त्याचप्रमाणे मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे असतील. या प्राधिकरणात भाप्रसे दर्जाचा मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य सह संचालक दर्जाचा जनरल मॅनेंजर, सह सचिव दर्जाचा जनरल मॅनेंजर, उपसंचालक दर्जाचे असिस्टंट जनरल मॅनेंजर (तांत्रिक) तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी अशी एकूण 14 पदे असतील.
प्राधिकरणाच्या स्तरावर कंत्राटी पद्धतीने कंत्राटी कर्मचारी देखील नेमण्यात येतील. ज्या बाबींची खरेदी करायची आहे त्याला एकत्रितरित्या प्रशासकीय विभागाच्या स्तरावर मान्यता देण्यात येऊन निधी उपलब्धतेनुसार खरेदी करण्यात येईल व संबंधित आरोग्य संस्थांना मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येईल. हे प्राधिकरण सुरु करण्यासाठी 65 कोटी 19 लाख 58 हजार इतका खर्च अपेक्षित आहे.
तंत्रशास्त्र तसेच तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरू निवड पद्धतीत सुधारणा
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि पुणे येथील महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या विद्यापीठांच्या अधिनियमात सुधारणा करण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय व महाधिवक्ता यांच्या अभिप्रायानुसार विविध अकृषी विद्यापीठांमधील कुलगुरु पदांच्या निवडीच्या पद्धतीत यापूर्वीच बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार लोणेरे आणि पुणे येथील तंत्रज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडपद्धतीत सुधारणा करण्यात येईल.
पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसच्या कामांना गती देणार
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसच्या कामांना गती देण्यासाठी सुमारे 787 कोटी सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे वाशिम तालुक्यातील 5 हजार 554 हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील 2 हजार 136 हेक्टर असे एकूण 7690 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाची साठवणूक क्षमता 33.27 दलघमी इतकी असून 26.34 दलघमी इतका उपयुक्त पाणी साठा आहे.
विविध विकास आराखड्यांचा आढावा
पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम विकास आराखड्यांचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी या कामांना अधिक गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
राज्यपालांचा अभिनंदन ठराव
राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा ठराव मांडला. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांचे अभिनंदन करण्यात आले.