जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 18 जागांसाठी होणार निवडणूक, इच्छूक उमेदवार लागले कामाला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख ।  जामखेड बाजार समितीची निवडणूक कधी होणार याकडे लक्ष ठेवून असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या बाजार समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  बाजार समितीचे संचालक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या इच्छूक उमेदवाराच्या गोटात हालचाली गतिमान झाल्या आहेत. बाजार समिती निवडणुकीमुळे जामखेड तालुक्याचे राजकीय वातावरण आता येत्या काही दिवसांत पुन्हा तापताना दिसणार आहे.

Election program of Jamkhed Bazar Committee announced, election will be held for 18 seats, willing candidates started working,

विविध कारणांमुळे जामखेड बाजार समितीची निवडणूक गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती. बाजार समितीचा कारभार प्रशासकाद्वारे सुरु होता. बाजार समितीची निवडणूक कधी जाहीर होणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. 20 मार्च 2023 रोजी अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 30 एप्रिल 2023 रोजी जामखेड बाजार समिती निवडणुकीचे मतदान होणार आहे.

शिंदे विरूध्द पवार संघर्ष पुन्हा तापणार

या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार हा संघर्ष पुन्हा तापताना दिसणार आहे. बाजार समितीची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात तगडे पॅनल उतरवण्यासाठी दोन्ही नेत्यांचा वजनदार उमेदवारावर डोळा असणार आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना दोन्ही नेत्यांची पसंती असणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होताना दिसणार आहे. निष्ठावंतांना न्याय देत असतानाच बाजार समितीचा नावलौकिक वाढवू शकणार्‍या अभ्यासू चेहर्‍यांना संधी देण्यावर दोन्ही नेत्यांचा भर असु शकतो अशी चर्चा आहे. असे असले तरी बाजार समितीवर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे.

18 जागांसाठी होणार बाजार समितीची निवडणूक

18 जागांसाठी जामखेड बाजार समितीची निवडणूक होणार आहे. यामध्ये कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती / भटक्या जाती 1 असे उमेदवार निवडले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी या मतदारसंघासाठी 4 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण 2,  अनुसूचित जाती जमाती 1 आणि आर्थिक दुर्बल घटक 1 असे सदस्य निवडले जाणार आहेत. व्यापारी / आडते मतदारसंघासाठी 2 जागा आहेत. हमाल/ मापाडी मतदारसंघासाठी 1 जागा आहे. असे एकुण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी जामखेडचे सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

जामखेड बाजार समिती निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे

उमेदवारी अर्ज दाखल करणे – 27 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2023 ( वेळ – सकाळी 11 ते दुपारी 3) ठिकाण – निवडणूक कार्यालय

अर्ज छाननी  – 5 एप्रिल 2023 ( सकाळी 11 वाजता) ठिकाण –  निवडणूक कार्यालय

वैध अर्जाची यादी प्रसिद्ध करणे – 6 एप्रिल 2023 (सकाळी 11 वाजता ) निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड

अर्ज मागे घेण्याची तारीख  – 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 ( सकाळी 11 ते दुपारी 3) निवडणूक कार्यालय

चिन्ह वाटप – 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता (निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड)

मतदान – 30 एप्रिल 2023 ( वेळ सकाळी 8 ते 4 )  स्थळ नंतर घोषित करण्यात येईल

निकाल – 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता (स्थळ नंतर घोषित करण्यात येईल)

निकाल घोषणा – मतमोजणी नंतर लगेच

जामखेड बाजार समिती निवडणूकीसाठी किती मतदार ?

  1. सेवा संस्था मतदारसंघ – 615 मतदार
  2. ग्रामपंचायत मतदारसंघ – 509 मतदार
  3. व्यापारी आडते मतदारसंघ – 333 मतदार
  4. हमाल मापाडी मतदारसंघ – 241 मतदार
  5. एकुण मतदार – 1698