कर्जत-जामखेड मतदारसंघात चांगले खेळाडू घडविण्यासाठी ५० शाळांना क्रिडा साहित्यांचे वाटप; रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त ग्यान-की’ फाऊंडेशनचा उपक्रम

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । ‘शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसते तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळालाही तेवढेच महत्त्व देणे आवश्यक असते. त्यामुळे यंदा ५० शाळांना ‘ग्यान-की’ फाऊंडेशनच्या माध्यमातून क्रिडा साहित्य देण्यात आले. यापुढेही मतदारसंघातील सर्वच शाळांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा माझा प्रयत्न कायम राहील. यासाठी अधिकारी, पालक, शिक्षक या सर्वांचं नेहमीच सहकार्य मिळत असतं. यातून चांगले विद्यार्थी आणि खेळाडू निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आहे.’’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

Distribution of sports materials to 50 schools to produce good athletes in Karjat-Jamkhed Constituency, An activity of Gyan-Ki' Foundation on  occasion of Rohit Pawar's birthday

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञान-की फाऊंडेशन’ यांच्यावतीने कर्जत-जामखेड तालुक्यातील ५० शाळांना क्रिडा साहित्य देण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या साहित्याचे कर्जत आणि जामखेड येथे वाटप करण्यात आले. त्यावेळी पवार बोलत होते.

आमदार रोहित पवार हे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा करत असतात. यंदा कर्जत तालुक्यातील २५ आणि जामखेड तालुक्यातील २५ अशा एकूण ५० शाळांना ‘सीएसआर’च्या माध्यमातून त्यांनी क्रिडा साहित्य दिले. यामध्ये प्रत्येक शाळेला व्हॉलीबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल जाळी, हवा भरण्याचा पंप, रिंगा, प्लॅस्टिक कोन आणि स्किपिंग रोप या साहित्याचा समावेश आहे. ग्रामीण भागात क्रिडा संस्कृतीला बळ देण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला आहे.

दरम्यान, क्रिडा साहित्याचे वाटप करण्याच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात व्हॉलीबॉलचा सामना झाला. यावेळी आमदार रोहित पवार यांनीही स्वतः व्हॉलिबॉलच्या मैदानावर उतरत खेळातील आपले नैपुण्य दाखवून दिले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या कौशल्याला दाद दिली.