खासदार डाॅ सुजय विखे पाटील यांनी केलेल्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ नये – चेअरमन कैलास वराट सर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । “केंद्र सरकारकडून आमदार रोहित पवार यांनी महामार्ग मंजुर केल्याचा जो दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे, तो हास्यास्पद असुन, खासदार डाॅ सुजय विखे पाटील यांनी केलेल्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ नये, असा इशारा साकत सेवा संस्थेचे चेअरमन कैलास वराट यांनी दिला आहे.”

No one should take credit for the work done by MP Sujay Vikhe Patil - Chairman Kailas Varat Sir

कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार हा संघर्ष शिगेला पोहचला आहे. दोन्ही आमदार आक्रमक झाले आहेत. त्यातच आता दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. यामुळेच जामखेड तालुक्याचे राजकीय वातावरण जोरदार तापू लागले आहे.

आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारकडून रस्त्याची कामे मंजुर केल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे, या दाव्याची हवाच विखे समर्थक कैलास वराट यांनी आज काढून घेतली आहे. खासदार विखे यांच्या कामाचे श्रेय घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

साकत सेवा संस्थेचे चेअरमन कैलास वराट सर यावेळी बोलताना म्हणाले की, खासदार डाॅ सुजय दादा विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच जामखेड तालुक्यात केंद्र सरकारचा निधी आला आहे. त्यासाठी आमदार राम शिंदे यांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे सुजयदादांनी आणलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये असा इशारा वराट यांनी दिला.

वराट पुढे म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने राष्ट्रवादीचे काही इच्छुक आपल्या नेत्यांला खुश करण्यासाठी निराधार चुकीचे वक्तव्य करत आहेत, केंद्र सरकारच्या माध्यमांतून आमदार रोहित पवारांनी रस्ते मंजुर करून आणल्याचा जो दावा केला जात आहे तो हास्यास्पद आहे.

वास्तविक खासदार डाॅ सुजय दादा विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून जामखेड तालुक्यातील महामार्गासाठी भरिव निधी आणला. यासाठी आमदार राम शिंदे यांचे मोठे सहकार्य मिळाले,असे कैलास वराट म्हणाले.

न केलेल्या कामाचे श्रेय घेणं हे आमदार रोहित पवार यांनाही कधीच आवडणार नाही, त्यामुळे चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी खासदार विखेंनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करून स्वा:ताचे हसे करून घेऊ नये अशी खोचक टीका यावेळी कैलास वराट यांनी केली आहे.