जामखेडसह अहमदनगर जिल्ह्यातील अवैध्य धंद्यांचा बिमोड करणार – जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचा इशारा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अहमदनगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस दल सक्षमपणे काम करत आहे. अगामी काळात अहमदनगर जिल्ह्यासह जामखेड तालुक्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचा बिमोड करणार असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी दिला.
अहमदनगर जिल्ह्यात नव्याने रूजू झालेले जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यास भेटी देण्यास सुरुवात केली आहे. आज 14 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी जामखेड पोलिस स्टेशनला भेट दिली. त्यानंतर त्यांनी जामखेडमधील मोजक्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव,कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती सह आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधिक्षक राकेश ओला बोलताना म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात यापुर्वी काम करण्याचा मला अनुभव आहे. त्यामुळे जिल्हा जाणून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली नाही. जिल्ह्यात गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा इरादा त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
जामखेड पोलिस स्टेशनसाठी कर्मचारी संख्या वाढवावी अशी विनंती पत्रकारांनी केली असता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की, जिल्ह्यातच कर्मचारी संख्या कमी आहे. अहमदनगर जिल्ह्यात पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांची संख्या वाढवी यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे. तो मंजुर होताच कर्मचारी संख्या वाढवली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसवण्यासाठी पोलिस दल कार्यरत राहील, अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी मोठी मोहिम उघडली जाईल. तसेच कम्युनिटी पोलिसिंगद्वारे पोलिस दल समाजातील विविध घटकांसाठी संवाद साधेल त्यातून पोलिस आणि समाजातील संवाद वाढवण्यावर भर दिला जाईल असेही पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी यावेळी स्पष्ट केले.
संपुर्ण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी सध्या जिल्ह्यात मोहिम सुरु आहे, ती अधिक गतिमान केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्पष्ट केले. यामुळे आता दोन नंबर व्यवसाय करणारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांयकाळी खर्डा पोलिस स्टेशनला भेट दिली. जामखेड आणि खर्डा भेटीत एसपी राकेश ओला यांनी दोन्ही पोलिस स्टेशनच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच पोलिस कर्मचार्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कर्जत उपविभागातील सर्व पोलिस स्टेशनच्या कामकाजाबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.