बिग ब्रेकिंग : कर्जत – जामखेडमधील 9 सराईत गुन्हेगार तडीपार, प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांचे आदेश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील 9 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याची धडाकेबाज कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांनी जारी केले आहेत. ( Deportation action against 9 criminals from Karjat-Jamkhed Constituency -Prantadhikari Dr. Ajit Thorbole)

कर्जत उपविभागांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस निरीक्षक, कर्जत व पोलीस निरीक्षक जामखेड यांच्या मार्फत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (च) अन्वये हद्दपार करणे कामीचे प्रस्ताव कर्जतचे प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांच्या कार्यालयाला प्राप्त झाले होते.

त्यानुसार प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले  यांनी कर्जत तालुक्यातील 02 व जामखेड तालुक्यातील 07 अश्या 9 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

कर्जत तालुक्यातील विलास अवलुक्या काळे, रा.कर्जत व पद्मराज अर्जुन ढोणे, रा. मिरजगाव या दोघांना अहमदनगर जिल्हा, बीड जिल्हयातील आष्टी तालुका, पुणे जिल्हयातील दौंड तालुका, सोलापूर जिल्हयातील करमाळा तालुक्यातुन ६ महिन्यांकरीता हद्दपार करण्यात आले आहे.

जामखेड तालुक्यातील महादेव रावसाहेब जायभाय, रा. जायभायवाडी यांला 1 वर्षांकरीता, पप्पु उर्फ ऋषिकेश मोहन जाधव, रा. जामखेड, शरद गुलबशा भोसले, रा. खांडवी, हनिफ आयुब कुरेशी, रा. खर्डा, दिपक अशोक चव्हाण रा. जामखेड, शरद उर्फ बंडु युवराज मुळे रा. सारोळा यांना 6 महिन्यांकरीता व अविनाश भुजंग निकम रा. शिऊर यांला 3 महिन्यांकरीता अहमदनगर, बीड व उस्मानाबाद जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे.

सदर प्रस्तावांवर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी चौकशी करुन अहवाल उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याकडे कारवाईसाठी पाठविले होते. त्यानुसार सदर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे असे प्रांत कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.