भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या कारला भीषण अपघात; ५० फूट नदीत कार कोसळली

सातारा- भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माण तालुक्याचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा फलटण तालुक्यात अपघात झाला आहे. गाडी ५० फूट नदीत कोसळून हा अपघात झाला. अपघातात आमदार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.

फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर ही घटना घडली. फॉर्च्युनर कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी ५० फूट नदीत कोसळली. या घटनेत आमदार जयकुमार गोरे यांच्यासह इतर ४ जण जखमी झाले असून गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Car accident of BJP MLA Jayakumar Gore, car plunged into a 50-foot river
आमदार जयकुमार गोरे

पहाटे ३.३० च्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी कारमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह ४ जण प्रवास करत होते. अपघातात जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांच्या छातीला मार लागल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलला उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर ४ पैकी २ जण गंभीर जखमी आहेत इतर २ किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींवर बारामती येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर इतरांवर फलटणच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

पुण्याहून गावी दहिवडीकडे जाताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील नदीचा कठडा तोडून ५० फूट नदीत कार कोसळली असं सांगण्यात येत आहे. सध्या गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.