कर्जत तालुक्यातील पाटेगाव, खंडाळा येथील 458.72 हेक्टर क्षेत्रावर MIDC ला तत्वता: मान्यता, पण पुढे काय ? हिवाळी अधिवेशनात गाजला मुद्दा, सरकारने काय निवेदन सादर केले ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ।  कर्जत-जामखेड मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र निर्माण व्हावे यासाठी आमदार रोहित पवारांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव आणि खंडाळा येथील औद्योगिक क्षेत्र MIDC होणार आहे. यासाठी सरकारने तत्वता: मान्यता दिली आहे. 458.72 हेक्टर क्षेत्रास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. याबाबत नागपुर हिवाळी अधिवेशनात उद्योग मंत्र्यांनी लक्षवेधी सूचनेवर निवेदन सादर केले. यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात MIDC होण्यासाठीचे एक पाऊल पडले आहे.

458.72 hectare area at Pategaon, Khandala in Karjat taluka to MIDC in principle, approval, but what next? What issue did rohit pawar present in the winter session?

आमदार रोहित पवार यांनी 2019 च्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात औद्योगिक वसाहत  मतदारसंघात स्थापन व्हावे याबाबत तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर कर्जत व जामखेड येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 29 जानेवारी 2020 रोजी बैठक देखील पार पडली.  या बैठकीत सदर प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्यात यावी व तसा सविस्तर अहवाल उच्चाधिकार समितीच्या विचारात सादर करावा असे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.

दरम्यान, कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी जाऊन एमआयडीसीसाठी योग्य असणारे ठिकाण कुठले असू शकते याबाबतचे सर्वेक्षण दोन्ही तालुक्यात करण्यात आले. त्यानंतर सर्व बाबींचा विचार करून दोन्ही तालुक्याला मध्यवर्ती ठरणारी आणि दोन्ही तालुक्याला मोठी एमआयडीसी मिळावी या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील मौजे पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली. मौजे पाटेगाव व खंडाळा येथील क्षेत्राची सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भू-निवड समितीने 18 नोव्हेंबर 2021 रोजी पाहणी केली. त्यानंतर सदर क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण जानेवारी 2022 मध्ये करण्यात आले.

14 जुलै 2022 च्या 143 व्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मौजे पाटेगाव व खंडाळा तालुका कर्जत येथील 458.72 हेक्टर क्षेत्र महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास अधिनियम 1961 च्या तरतुदीनुसार लागू करण्यास तत्वता: मान्यता देण्यात आली.परंतु अजूनही या क्षेत्राची अधिसूचना झालेली नाही त्यामुळे रोहित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात 23 डिसेंबर 2022 रोजीच्या विधीमंडळाच्या कामकाजातील लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले आणि हा मुद्दा उपस्थित केला.

लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने उद्योग मंत्र्यांनी त्यांच्या निवेदनात कर्जत येथील पाटेगाव व खंडाळा येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आल्याची बाब मान्य केली व कर्जत तालुक्यातील मौजे पाटेगाव व खंडाळा येथील 458.72 हेक्टर क्षेत्रास उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली असून औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल तसेच सदर औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूकदारांनी भूखंडाची मागणी केल्यास पास थ्रू पद्धतीने भूखंड उपलब्ध करून देण्याची तजविज ठेवलेली आहे. असे विधीमंडळाच्या पटलासमोर निवेदनाद्वारे जाहीर केले. त्यामुळे लवकरच कर्जत तालुक्यातील खंडाळा व पाटेगाव येथे औद्योगिक क्षेत्र विकसित होईल व परिसरातील बेरोजगार युवकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

ज्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी नाही अशा मतदारसंघांपैकी कर्जत-जामखेड मतदारसंघात इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात एमआयडीसी दिली जात आहे. एमआयडीसी येणारच हा आत्मविश्वास आमदार रोहित पवार यांना असल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलून वेळोवेळी पाठपुरावा करून नगर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच श्रीगोंदा ते जामखेड हा देखील महामार्ग रोहित पवार यांनी मंजूर करून आणला आणि या दोन्ही महामार्गांचा फायदा हा आता या एमआयडीसीत प्रकल्प आणण्यासाठी होणार आहे.

प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची योजना आणली जाईल, असा शब्द सर्व महिला-भगिनींना दिला होता, तो मी पूर्ण केला. तसेच युवकांना आणि कर्जत-जामखेडमधील व्यावसायिकांना एक मोठी एमआयडीसी आणेल हा शब्द देखील दिला होता, तो ही शब्द मी पूर्ण केला याचा आनंद आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मंत्री सुभाष देसाई साहेब, राज्यमंत्री अदितीताई तटकरे, सर्व अधिकारी आणि आताचे मंत्री उदय सामंत साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो असे आमदार रोहित पवार म्हणाले.