जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघात सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही तालुक्यातील सर्वच गावांमध्ये बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळू लागला आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावागावात साखळी उपोषण सुरु आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या कर्जत व जामखेड तालुका बंदच्या अंदोलनास भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे, याबाबतचे निवेदन कर्जत भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे व जामखेड भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी जारी केले आहे.
कर्जत भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी मराठा आरक्षणसाठी उपोषण करणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे दि 9 सप्टेंबर 2023 रोजी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन त्यांच्या अंदोलनास पाठिंबा दिला होता.एक मराठा, लाख मराठा ही घोषणा देत सक्रिय पाठिबा दर्शविला होता.
त्यानंतर 6 ऑक्टोबर 2023 रोजी जामखेड दौर्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे श्री क्षेत्र चोंडी येथे स्वागत करत त्यांनी हाती घेतलेल्या लढ्यास पाठिंबा दर्शविला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत जामखेड शहरात पार पडलेल्या विराट जाहीर सभेस आमदार प्रा राम शिंदे यांनी स्थानिक भूमिपुत्र म्हणून उपस्थित राहीले होते. यावेळी शिंदे यांना सकल मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन समाजाच्या वतीने देण्यात आले होते. त्यानंतर चोंडी येथे धनगर आरक्षण दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील उपस्थित राहिले होते. या दसरा मेळाव्यात आमदार प्रा.राम शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेल्या अंदोलनास पाठिंबा दर्शवला होता.
मराठा समजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सात दिवसांपासून उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. या अंदोलनाला पाठिंबा म्हणून कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये आज( मंगळवारी) बंद पाळण्यात येत आहे. या अंदोलनास भाजपने पाठिंबा दिला आहे. सकाळपासूनच कर्जत जामखेड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद पाळला जात आहे. भाजपच्या सर्व आघाड्या, सेलचे कार्यकर्ते आजच्या बंदमध्ये सक्रीय सहभागी आहेत, असे शेखर खरमरे व अजय काशिद म्हणाले.