संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोलनास जामखेड तालुक्यात पाठिंबा वाढू लागला, शुक्रवारी अरणगाव बंदची हाक !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक लढा पुकारणारे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. या अंदोलनास जामखेड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला आहे. तालुक्यातील खर्डा येथील युवक संतोष साबळे याने मोबाईल टॉवरवर चढून आरक्षणाची मागणी केली होती. तसेच जामखेड शहरात मराठा बांधवांनी साखळी उपोषण केले होते. या अंदोलनाची धग आता आणखीन वाढू लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी अरणगाव बंदची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच अंकुश शिंदे यांनी दिली आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे अंदोलन हाती घेतले होते. सरकारने निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांची मुदत मागितली होती. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत देत अंदोलन स्थगित केले होते. सरकारने मागितलेली मुदत संपण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र पिंजून काढत मराठा आरक्षण अंदोलनाची मशाल गावागावात नेली. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या सभांना ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. आंतरवली सराटी येथील सभेने तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. लाखोंचा जनसागर या सभेला आला होता. या सभेनंतर सरकार तातडीने निर्णय घेईल असे वाटत होते. परंतू सरकारने अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही.
दसर्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चोंडी येथे आयोजित धनगर आरक्षण दसरा मेळाव्यात उपस्थित राहून मराठा आणि धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण मिळवणारच असा सरकारला गर्भित इशारा दिला. या दसरा मेळाव्यातून महाराष्ट्रातील दोन मोठे जात समूह एकत्र आल्याचा संदेश महाराष्ट्रात गेला. धनगर आरक्षणाच्या लढाईत मोठा भाऊ म्हणून मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला दिला. यातून राज्यात नवे समीकरण पुढे आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्याच्या दुसर्या दिवसांपासून आंतरवली सराटी या गावात पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. या अंदोलनास राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जामखेड तालुक्यातूनही या अंदोलनास मोठा पाठिंबा मिळत आहे. तालुक्यातील खर्डा येथील युवक संतोष साबळे याने बुधवारी खर्डा शहरातील मोबाईल टॉवरवर चढून आरक्षणाची मागणी केली होती. तसेच जामखेड शहरात मराठा बांधवांनी साखळी उपोषण केले होते. गावागावात दररोज साखळी उपोषण होणार आहे.
या अंदोलनाची धग आता आणखीन वाढू लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी अरणगाव बंदची हाक देण्यात आली आहे, तसेच गावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच अंकुश शिंदे यांनी दिली आहे.
