रेहकुरी अभयारण्याबाबत राज्य सरकारकडून मोठी घोषणा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्याबाबत गेल्या 16 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयावर राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेेल्या बैठकीत अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील रेहकुरी अभयारण्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Big announcement from Maharashtra Government about Deulgaon Rehkuri Sanctuary )

राज्य वन्यजीव मंडळाची सोमवारी पार पडली. या बैठकीत राज्यातील सुमारे 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  या 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासात अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकुरी अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र हे देशातील पहिले वन्यजीव अधिवास घोषित होणारे राज्य ठरले आहे.

राज्यात 49 अभयारण्ये आणि सहा राष्ट्रीय उद्याने असे एकूण 55 संरक्षित क्षेत्र आहेत. या सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यातील 10 अभयारण्याला धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य वन्यजीव मंडळाच्या 15 व्या बैठकीदरम्यान धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी हे प्रस्ताव मंडळाची उपसमिती तयार करून तिच्याकडे परीक्षणासाठी पाठवण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाच्या प्रस्तावाचे परीक्षण करण्यासाठी महसूल विभागनिहाय चार उपसमित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम 2006 नुसार, वनवासी अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी यांच्या हक्कांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील क्षेत्रात वन्यजीव संवर्धनासाठी वनहक्क कायद्याच्या कलम दोन(ब)नुसार धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणे अपेक्षित होते. या निर्णयामुळे वन्यजीवांसाठी संरक्षित अधिवास उपलब्ध होणार आहे.

10 धोकाग्रस्त अधिवास खालीलप्रमाणे

1) देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य (अहमदनगर)
2) मयुरेश्वर सुपे अभयारण्य (पुणे)
3) बोर (वर्धा)
4) नवीन बोर (वर्धा)
5) विस्तारित बोर अभयारण्य (वर्धा)
6) नरनाळा अभयारण्य (अकोला)
7) लोणार अभयारण्य (बुलडाणा)
8) गुगामल राष्ट्रीय उद्यान (अमरावती)
9) येडशी रामलिंगघाट अभयारण्य (उस्मानाबाद)
10) नायगाव मयूर अभयारण्य (बीड)

राज्यातील 12 संवर्धन राखीव क्षेत्र

आज घोषित करण्यात आलेल्या 12 संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये धुळे जिल्ह्यातील (दोन) चिवटीबावरी (66.04 चौ.कि.मी), अलालदारी (100.56 चौ.कि.मी), नाशिक जिल्ह्यातील (चार) कळवण (84.12 चौ.कि.मी), मुरागड (42.87 चौ.कि.मी), त्र्यंबकेश्वर (96.97 चौ.कि.मी), इगतपुरी (88.499 चौ.कि.मी) रायगड जिल्ह्यातील (दोन) रायगड (47.62 चौ.कि.मी), रोहा (27.30 चौ.कि.मी), पुणे जिल्ह्यातील भोर (28.44 चौ.कि.मी), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू (1.07 चौ.कि.मी ), कोल्हापूर जिल्ह्यातील मसाई पठार (5.34 चौ.कि.मी), नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा (103.92 चौ.कि.मी) यांचा समावेश आहे.