जामखेड शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न ३१ मे पूर्वी निकाली काढा – सभापती प्रा राम शिंदेंचे प्रशासनाला निर्देश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवून रस्त्याचे काम पुर्ण करावे, येत्या पावसाळ्यात नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अत्यंत दक्षता घ्यावी,३१ मे पुर्वी सदरची कार्यवाही पुर्ण करावी असे स्पष्ट निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले.

Resolve issue of encroachment in Jamkhed city before May 31- sabhapati Ram Shinde's instructions to administration

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी चे काम गेल्या चार वर्षांपासून रखडलेले आहे. या कामातील अनियमितता दुर व्हावी, काम गतीने आणि दर्जेदार व्हावे, अतिक्रमण हटवावे, यासह अन्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांच्यासह अनेकांनी अंदोलने, उपोषण करत हा ज्वलंत विषय धगधगता ठेवला.रखडलेल्या कामाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. जामखेड शहरातील जनतेची जनभावना लक्षात घेता सभापती प्रा राम शिंदे यांनी आज (१३ रोजी) विधानभवनात राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या भागातील अतिक्रमणे हटवून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या. येत्या पावसाळ्यात नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अत्यंत दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित विभागांना शिंदे यांनी दिले.

जामखेड नगरपरिषद प्रशासन, महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार यांनी तातडीने समन्वय साधून ३१ मे पूर्वी अतिक्रमणासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी शिंदे यांनी या बैठकीत दिले.

प्रा राम शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे जामखेड शहरातील प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरवासीयांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. सध्या घडत असलेल्या घडामोडी पाहता  शहरातील अतिक्रमणांवर हातोडा पडण्याचे चिन्हे दिसू लागली आहे.