Vinod Khute : १०० कोटींचा घोटाळा! विनोद खुटे हाजीर हो, VIPS ग्रुप मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या विशेष न्यायालयाचे आदेश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मुंबई येथील विशेष PMLA (ED) न्यायालयाने बहुचर्चित VIPS Group व Global Affiliate Business (GAB) प्रकरणात विनोद खुटे व इतर आरोपींविरुद्ध गंभीर निरीक्षण नोंदवत न्यायालयात खटला चालवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडी न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे विनोद खुटेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. (Vinod khute latest news)

ईडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर बी रोटे यांनी दिनांक ८ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार मुख्य आरोपी विनोद तुकाराम खुटे, किरण पितांबर अनारसे, मंगेश सिताराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, अजिंक्य रावसाहेब बडदे, दिगंबर गणपत तोरसकर इ विरुद्ध Prevention of Money Laundering Act (PMLA) अंतर्गत गुन्ह्याची प्रथमदर्शनी नोंद घेण्यात आली असून सर्व आरोपींना १२ जून २०२६ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate – ED) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपींनी विविध कंपन्या, फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टोकरन्सी व्यवहार, MLM योजना व तथाकथित गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, गुंतवणूकदारांकडून १०० कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली असून त्या निधीचे शेल कंपनीज्, हवाला व्यवहार व क्रिप्टोकरन्सी च्या माध्यमातून layering व diversion करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष सरकारी वकिल ॲड. कविता पाटील यांनी ईडी ची बाजू मांडली.
न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, ED ने सादर केलेले कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब, money trail, flow chart व इतर तपास सामग्री पाहता आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी (prima facie) पुरेसा पुरावे उपलब्ध असल्याचे दिसून येते. तसेच मनी लॉन्डरिंग हा गंभीर आर्थिक गुन्हा असून समाजाच्या आर्थिक स्थैर्यावर तसेच देशाच्या अर्थकारणावर परिणाम करणारा गंभीर प्रकार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सदर प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असून पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात गुंतवणूकदारांच्या वतीने ॲड. विकास शिंदे काम पाहत असून संबंधित गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत आहेत. तसेच पुढील न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कायदेशीर पावले उचलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काय आहे हे प्रकरण?
VIPS ग्रुपचा मुख्य सूत्रधार विनोद तुकाराम खुटे याने VIPS Wallet Private Limited, VIPS Trade Finance Private Limited, Global Affiliate Business (GAB) आणि Kana Capital (दुबई) या कंपन्यांच्या माध्यमातून एक बनावट गुंतवणूक योजना राबवली. दरमहा २% ते ४% परतावा आणि रेफरल कमिशनचे आमिष दाखवून सामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले. RBI किंवा SEBI यांची परवानगी नसतानाही हे व्यवहार चालवले जात होते.
ED च्या तपासात काय उघड झाले?
- गोळा केलेला पैसा बनावट कंपन्यांमार्फत (Wonder Agri Services, First Traders इ.) फिरवला जात होता
- APMC परवाना असलेल्या शेतकरी कंपन्यांच्या नावाने रोख रक्कम काढली जात होती
- हवाला ऑपरेटरमार्फत पैसे दुबईला पाठवले जात होते
- USDT क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून परदेशी खात्यांमध्ये जमा केले जात होते
- MetaTrader 5 (MT5) प्लॅटफॉर्मवर बनावट ट्रेडिंग दाखवले जात होते (डब्बा ट्रेडिंग)
- विनोद खुटेने दुबईत मिळकती खरेदी केल्या
- इडीने विनोद कुटेच्या ₹३७.५२ कोटींच्या मालमत्तेवर आधीच टाच आणली गेली आहे
कोण आहेत ९ आरोपी
- विनोद तुकाराम खुटे – मुख्य सूत्रधार
- किरण अनारसे – Director, VIPS Wallet
- मंगेश खुटे – विनोद यांचा चुलत भाऊ, GAB भागीदार
- संतोष खुटे – विनोद यांचा सख्खा भाऊ, Additional Director
- अजिंक्य बडाधे – GAB भागीदार
- दिगंबर तोरसकर – फील्ड एजंट, गुंतवणूकदारांकडून ₹६.१५ कोटी गोळा केले
- M/s VIPS Wallet Pvt. Ltd
- M/s Global Affiliate Business
- M/s VIPS Trade Finance Pvt. Ltd.