NH548D : न्हावरा फाटा ते जामखेड राष्ट्रीय महामार्गाचा सोक्षमोक्ष लागणार! ८ दिवसांत अहवाल सादर करा; सभापती प्रा. राम शिंदेंचे बांधकाम सचिवांना कडक निर्देश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : न्हावरा फाटा ते जामखेड (NH-548D) या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील निकृष्ट दर्जा, रखडलेली कामे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका यामुळे कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा या तालुक्यातील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. याची गंभीर दखल घेत विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुंबईत उच्चस्तरीय आढावा बैठक घेत राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पंचनामा करत चिरफाड केली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

न्हावरा फाटा ते जामखेड (NH-548D) या राष्ट्रीय महामार्गाच्या तक्रारींबाबत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (१३ रोजी) मुंबई विधानभवनात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना (राष्ट्रीय महामार्ग) पुढील ८ दिवसांच्या आत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. शिंदे यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग ५४८डी च्या कामांचा सोक्षमोक्ष लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
२०१९ पासून काम रेंगाळले; नागरिकांचा जीव धोक्यात
सन २०१९ मध्ये या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, सात वर्षे उलटूनही हे काम अद्याप अपूर्णच आहे. पूर्ण झालेल्या अनेक ठिकाणी रस्त्याला मोठे तडे गेले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नावर स्थानिक पातळीवर मोठा संताप व्यक्त केला जात होता. जामखेड तालुक्यात या रस्त्याची सर्वाधिक दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बैठकीत सादर केले फोटो आणि व्हिडीओचे पुरावे
आजच्या बैठकीत प्रा. राम शिंदे यांनी या रस्त्याची विदारक स्थिती दर्शविणारे छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रशासनासमोर सादर केले. रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला असतानाही संबंधित यंत्रणा ढिम्म का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. निधीचा अपव्यय आणि प्रशासकीय दिरंगाईबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सचिवांना ८ दिवसांचा अल्टिमेटम
बैठकीतील चर्चेनंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना (राष्ट्रीय महामार्ग) तातडीने प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले. येत्या ८ दिवसांत हा पाहणी दौरा पूर्ण करून रस्त्याची सद्यस्थिती आणि कामातील त्रुटींबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे.
दोषींवर होणार कठोर कारवाई
या रस्ते कामात झालेल्या भ्रष्टाचाराची आणि निकृष्ट कामाची चौकशी करून, विलंब लावणाऱ्या कंत्राटदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देशही सभापतींनी दिले आहेत. रस्ता तातडीने दुरुस्त करून तो सुरक्षित आणि वाहतुकीयोग्य करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे न्हावरा फाटा ते जामखेड या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना आणि स्थानिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, मधुकर आबा राळेभात आणि अंकुश ढवळे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.