वातावरण तापलं ! माजी सभापती तुषार पवारांनी दिला उपोषणाचा इशारा, जिल्हा बँकेच्या संचालकावर पवारांनी केला गंभीर आरोप !
जामखेड बाजार वृत्तसेवा । सत्तार शेख । एकिकडे जामखेड बाजार समितीची निवडणुक रंगात आली आहे. त्यातच शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पिक कर्ज नुतनीकरण क.म. प्रस्तावास मंजुरी देण्यास जिल्हा बँक आणि तालुका विकास अधिकारी कार्यालयाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार माजी सभापती तुषार पवार यांनी उघडकीस आणला आहे. जिल्हा बँकेविरोधात आक्रमक झालेल्या माजी सभापती तुषार पवार यांनी उपोषणाचे अंदोलन हाती घेण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना ईमेलद्वारे पाठवले आहे. तुषार पवार यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे बाजार समिती निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.
माजी सभापती तुषार पवार हे नान्नज सेवा संस्थेचे चेअरमन आहेत.पवार हे जामखेडच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहे. पवार पिता-पुत्र आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहेत.सध्या सुरु असलेल्या बाजार समिती निवडणुकीत तुषार पवार हे भाजपचे उमेदवार आहे. बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलच्या नेतृत्वात जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात आहेत. राळेभात यांच्या दबावातून जिल्हा बँक आणि तालुका विकास अधिकारी कार्यालयाकडून नान्नज सेवा संस्थेस सन 2023-24 चे पिक कर्ज नुतनीकरण क.म. (कर्ज मंजुरी प्रस्ताव) प्रस्तावास मंजुरी देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या आरोप करत या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपोषण करणार असल्याचा इशारा तुषार पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. ऐन बाजार समिती निवडणुकीत तुषार पवार यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
माजी सभापती तथा नान्नज विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन तुषार पवार यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नान्नज विविध कार्यकारी सेवा संस्थेने सन 2022-23 मध्ये 14 कोटी रुपये कर्जवाटप केले होते. 31 मार्च 2023 अखेर 12 कोटी 54 लाख वसुल करून बँकेच्या कर्जाची फेड करण्यात आली. सुमारे 90% टक्के संस्थेने वसुल केला. चालु आर्थिक वर्षासाठी नान्नज संस्थेने 2023-24 चे पिक कर्ज नुतणीकरण क.म. प्रस्ताव जिल्हा सहकारी बँकेच्या नान्नज शाखेत 12 मार्च 2023 रोजी दाखल केले. त्यास 10 एप्रिल 2023 पर्यंत बँकेने मंजुरी देणे आवश्यक होते. परंतू एप्रिल महिना संपत आला तरी प्रस्तावास मंजुरी मिळालेली नाही. यामुळे संस्थेला पिक कर्ज वाटप करता आले नाही.
सहकाराच्या राजकारणात नान्नज सेवा संस्थेचा मोठा नावलौकिक आहे. सदर संस्थेकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सभासद करून कर्ज पुरवठा केला जातो. संस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असल्याने कर्जदार शेतकरी कर्ज वसूली देण्यास नेहमी आग्रेसर असतात. यामुळे सर्वाधिक वसुल असलेली संस्था असा नान्नज संस्थेचा तालुक्यात नावलौकिक आहे. सध्या शेतकरी बांधव खरिप हंगामाच्या तयारीत आहेत. शेतीच्या मशागतीचे कामे सुरु आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पैश्यांची आवश्यकता असते. त्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या धोरणाप्रमाणे संस्थेकडे कागदपत्रांची पुर्तता केली आहे. त्यानुसार संस्थेने पिक कर्ज नुतनीकरण क.म प्रस्ताव जिल्हा बँक नान्नज शाखेत मंजुरीस दाखल केलेला आहे. मात्र 21 एप्रिल अखेरपर्यंत या प्रस्तावास मंजुरी मिळालेली नाही. सदर प्रस्ताव मंजुर व्हावा यासाठी संस्थेचे चेअरमन तुषार पवार यांनी अनेकदा तालुका विकास अधिकारी कार्यालय, जामखेड याठिकाणी चकरा मारल्या मात्र सदर प्रस्तावाच्या मंजुरीस टाळाटाळ केली जात असल्याचे पवार यांनी निदर्शनास आणले आहे.
गेल्या महिनाभरापासून जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी राष्ट्रवादीशी युती करून आपला पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यांच्या पॅनलविरोधात मी स्वता : निवडणूक लढवत आहे. याच राजकीय आकसातून राळेभात यांनी माझ्या संस्थेच्या क.म.प्रस्तावास मंजुरी देऊन नये यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आहे. त्यामुळेच बँकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित प्रस्तावाची अडवणूक केलेली आहे. वास्तविक पाहता मार्केटच्या निवडणूकीचा आणि नान्नज वि.का.सेवा सहकारी संस्थेच्या शेतकरी सभासदांचा काहीही संबंध येत नाही. परंतु संचालकाच्या आडमुठ्या धोरणामुळे जाणीव पूर्वक शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे, असा गंभीर आरोप माजी सभापती तुषार पवार यांनी निवेदनाद्वारे करत राजकीय बार उडवून दिला आहे.
दरम्यान, नान्नज विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या पिक कर्ज नुतनीकरण क.म प्रस्तावाच्या मंजुरीस टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार जामखेडचे सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांच्याकडे फोनद्वारे करण्यात आली होती, घोडेचोर हे अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी असल्यामुळे घोडेचोर यांनी जामखेडच्या तालुका विकास अधिकारी कार्यालयात वारवांर फोन करून पिक कर्ज क.म. प्रस्ताव द्यावयाचे सूचना दिल्या परंतु बँकेने आज पर्यंत संस्थेच्या नुतणीकरण क.म. प्रस्तावास मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे सभासदांना शासनाच्या धोरणाप्रमाणे संस्था कर्ज वितरण करू शकत नाही, त्यामुळे जर संस्थेच्या सभासदाने पिक कर्ज न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्यास त्यास जिल्हा सहकारी बँक व प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील, असेही निवेदनात म्हटले आहे.
नान्नज सेवा संस्थेच्या क.म प्रस्तावास मंजुरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा बँक व तालुका विकास अधिकारी कार्यालय यांच्या विरोधात नान्नज वि.का.सेवा संस्थेचे चेअरमन तुषार बाबासाहेब पवार हे सर्व संचालक मंडळ तसेच सभासदांना सोबत घेऊन येत्या 25 एप्रिल 2023 रोजी अहमदनगर येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. तसे निवेदन तुषार पवार यांनी संबंधित कार्यालयांसह राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रा.राम शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांना दिले आहे.