जामखेड तालुक्यात होणार अमेझॉन कोडींग लॅॅबची उभारणी, रोहित पवारांच्या पुढाकारातून शालेय विद्यार्थ्यी शिकणार संगणकीय भाषा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’ आणि ‘ॲमेझॉन इंडिया’ यांच्यावतीने कर्जत व जामखेड तालुक्यातील आठवीपर्यंत शाळांमध्ये कोडिंग लॅबची उभारणी करण्यात येणार आहे. या माध्यमांतून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या संगणकीय भाषा शिकवण्यात येणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कोडिंग लॅबची उभारणी होणार आहे.

Amazon coding lab will be set up in Jamkhed taluka, school students will learn computer language through the initiative of Rohit Pawar

कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी, मिरजगाव व बाभूळगाव खालसा आणि जामखेड तालुक्यातील चौंडी, सारोळा आणि जामखेड शहरातील उर्दु शाळा आणि सारोळा येथील शाळांमध्ये लॅब उभारण्यात येणार आहे. आमदार रोहित पवार यांनी आज या शाळांना भेट दिली. यावेळी त्यांना राखीही बांधण्यात आली.

जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी प्रामुख्याने सहावी ते आठवीचे विद्यार्थी तसेच शाळेचे शिक्षक यांना या लॅबचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. निवडण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारण्यात येणाऱ्या अमेझॉन कोडींग लॅबमध्ये प्रत्येक शाळेला ८ कॉम्प्युटर सिस्टीम देण्यात येणार आहे. तसेच दोन्ही तालुक्यात कोडींगमध्ये निपुण असलेल्या प्रशिक्षकाचीही नेमणूक करण्यात येणार आहे. या लॅबमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना सी, सी++, जावा (JAVA) आदी संगणकीय भाषा शिकवण्यात येतील.

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संगणकाविषयी भीती आणि निरक्षरता असते. कोडींग लॅबच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांमधील संगणकाविषयीची भीती दूर होऊन त्यांना संगणकाचे ज्ञान मिळेलच परंतु विविध संगणकीय भाषांमुळे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, गेमिंग, ॲनिमेशन यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांना भविष्यात नवनवीन संधी मिळतील.

कोडींग लॅब उभारणाऱ्या शाळेत इतर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकही येऊन प्रशिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे या उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शाळांना होणार आहे. तसेच यामध्ये शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने या कार्यक्रमात सातत्य राहील आणि ते विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करू शकतील.